विजय हजारे ट्रॉफी २०२४-२५ स्पर्धेतील दुसरा सेमी फायनल सामना विदर्भ आणि महाराष्ट्र यांच्यात रंगला आहे. बडोदाच्या कोटांबी स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात विदर्भाच्या सलामी जोडीनं संघाला धमाकेदार सुरुवात करुन दिली. या सामन्यात महाराष्ट्र संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यश राठोड आणि ध्रुव शौरी या जोडीनं विदर्भाच्या संघाला दमदार सुरुवात करून दिली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सलामी जोडीची द्विशतकी भागीदारी
यश आणि शौरी जोडीनं पहिल्या विकेटसाठी २२४ धावांची दमदार भागीदारी रचली. विदर्भ संघाच्या ताफ्यातून खेळणाऱ्या २४ वर्षीय यश राठोड याने महाराष्ट्र संघाविरुद्ध स्पर्धेतील पहिल वहिलं शतक साजरे केले. त्याने सेमीफायनल लढतीत ११६ चेंडूत १०१ धावांची खेळी केली. महाराष्ट्राच्या ताफ्यातील सत्यजीतनं त्याच्या खेळीला ब्रेक लावला. दुसऱ्या बाजूला ध्रुव शौरीनं १२० चेंडूत १४ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ११४ धावांची खेळी केली.
दिल्ली सोडून विदर्भात आलाय ध्रुव शौरी
देशांतर्गत क्रिकेटमध्ये विदर्भ संघाच्या ताफ्यात दिसणारा ध्रुव शौरी हा आधी दिल्लीच्या ताफ्यातून खेळायचा. २०२३-२४ च्या हंगामाआधी तो दिल्ली संघ सोडून विदर्भाच्या ताफ्यात सामील झाला. विदर्भ संघात सामील होण्याआधी ४० पेक्षा अधिक सामन्यात त्याने दिल्ली संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये नाबाद २५८ ही त्याची सर्वोच्च खेळी आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ४ हजारहून अधिक धावा करणाऱ्या ध्रुव शौरीनं लिस्ट ए क्रिकेटमध्ये २ हजारहून अधिक धावा काढल्या आहेत.
यश राठोडची देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरी
यश राठोडच्या कामगिरीबद्दल बोलायचं तर २४ वर्षीय युवा क्रिकेटरनं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १३ सामन्यातील २१ डावात १००० हून अधिक धावा केल्या आहेत. १४१ ही त्याची सर्वोच्च कामगिरी आहे. लिस्ट ए क्रिकेटमध्ये २२ सामन्यात त्याच्या खात्यात ७२१ धावांची नोंद आहे.