लंडनः 'विराट' विजयाचा अध्याय रचण्यासाठी टीम इंडिया साहेबांच्या देशात पोहोचली असतानाच, इंग्लंडमधील क्लब क्रिकेटमध्ये एका मराठमोळ्या विदर्भवीराने केलेल्या पराक्रमाची जोरदार चर्चा ऐकायला मिळतेय. श्रीकांत वाघ या तेजतर्रार गोलंदाजानं एका डावात दहा विकेट घेऊन इतिहास रचला आहे. तो काही काळापूर्वी भारत-अ संघाचा शिलेदार होता.
श्रीकांत सध्या स्टॉकस्ले क्लबकडून खेळतोय. नॉर्थ यॉर्कशायर अँड साउथ डरहॅम क्रिकेट लीगमध्ये त्यानं आपल्या कामगिरीनं सगळ्यांनाच चकित केलं. शनिवारी, मिडल्सब्रॉट सीसी संघाविरुद्ध त्यानं ११.४ षटकांत ३९ धावांच्या मोबदल्यात १० विकेट घेतल्या. त्याच्या या धडाकेबाज गोलंदाजीच्या जोरावर स्टॉकस्ले संघानं १३५ धावांच्या दणदणीत विजयाची नोंद केली. त्यामुळे त्यांच्या खात्यात २५ गुण जमा झाले आहेत.
श्रीकांत वाघनं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्येही आपली ताकद दाखवून दिली आहे. ६३ सामन्यांत त्यानं १६१ विकेट घेतल्यात. त्यासोबतच, २३.७१ च्या सरासरीने १५८९ धावाही केल्यात. त्यात एक शतक आणि चार अर्धशतकांचा समावेश आहे.
राजस्थान रॉयल्स आणि पुणे वॉरियर्स इंडिया या संघांकडून श्रीकांत आयपीएल स्पर्धेतही आठ सामने खेळला आहे. तिथे त्याच्या नावावर पाच विकेट आहेत.