सूरत - रणजी करंडकाच्या इतिहासात विदर्भाने पहिल्यांदाच उपांत्य फेरीत धडक मारण्याचा पराक्रम गाजवला आहे. या स्पर्धेतल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात विदर्भाने केरळचा 412 धावांनी धुव्वा उडवला. विशेष म्हणजे मुंबईचे माजी कसोटीवीर चंद्रकांत पंडित हे विदर्भ संघाचे प्रशिक्षक आहेत.
लालभाई कॉन्ट्रॅक्टर स्टेडिअमवर पार पडलेल्या केरळ विरुद्ध विदर्भ उपांत्यपूर्व रणजी सामन्यात विदर्भाने आज केरळवर ४१२ धावांनी विजय मिळवला आहे. आदित्य सरवटेने विदर्भाकडून ६ बळी मिळवत महत्वाची कामगिरी बजावली. केरळकडून दुसऱ्या डावात सलमान मिर्झाने अर्धशतकी खेळी केली. परंतु त्याच्या १०४ चेंडूत ६४ धावांच्या खेळीला बाकीच्या फलंदाजांकडून हवी तशी साथ मिळाली नाही. केरळकडून मोहम्मद अझरुद्दीन (२८),संजू सॅमसॅन (१८),सचिन बेबी(२६) आणि रोहन प्रेम(१३*) यांनी दोन आकडी धावसंख्या पार केली बाकीच्या फलंदाजांना दोन आकडी धावसंख्याही पार करता आली नाही. केरळने दुसऱ्या डावात १६५ च धावा केल्या.
विदर्भाकडून आदित्य सरवटे(६),रजनीश गुरबानी(२), कर्ण शर्मा(१) आणि अक्षय वखारे(१) यांनी बळी घेतले. तत्पूर्वी विदर्भाने दुसरा डाव ९ बाद ५०७ धावांवर घोषित केला होता. विधर्भाकडून कर्णधार फेज फेझल(११९) आणि अपूर्व वानखेडेने(१०७) शतकी खेळी केली. तर वासिम जफर (५८), गणेश सतीश(६५) आणि अक्षय विनोद वाडकर(६७*) यांनी अर्धशतकी खेळी केली होती.
दरम्यान, रणजी करंडकाच्या उपांत्य फेरीत विदर्भाचा सामना बलाढ्य कर्नाटकशी होईल. हा सामना 17 ते 21 डिसेंबर या कालावधीत कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर खेळवण्यात येण्याची शक्यता आहे.
Web Title: Vidarbha in the semi-finals for the first time in the history of Ranji Trophy
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.