Join us  

चाहरच्या भेदकतेनंतरही विदर्भ संघाची बाजी

टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात शानदार हॅट््ट्रिक नोंदवल्यानंतर राजस्थानकडून सैयद मुश्ताक अली टी२० स्पर्धेत ‘ब’ गटाच्या लढतीत विदर्भ संघाविरुद्ध भेदक मारा केला.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 3:57 AM

Open in App

तिरुवनंतपुरम : मध्यमगती गोलंदाज दीपक चाहरने बांगलादेशविरुद्ध भारताच्या अखेरच्या टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात शानदार हॅट््ट्रिक नोंदवल्यानंतर राजस्थानकडून सैयद मुश्ताक अली टी२० स्पर्धेत ‘ब’ गटाच्या लढतीत विदर्भ संघाविरुद्ध भेदक मारा केला. पण या शानदार कामगिरीनंतरही राजस्थान संघाला पराभवास सामोरे जावे लागले.चाहरने अखेरच्या षटकात ४ बळी घेतले, पण त्याची ही कामगिरी अखेर व्यर्थच ठरली. दखल घेण्याची बाब म्हणजे त्याची हॅटट्रिक थोडक्यात हुकली. पावसाच्या व्यत्ययामुळे प्रत्येकी १३ षटकांच्या झालेल्या या लढतीत राजस्थानने १३ षटकांत ८ बाद १०५ धावा केल्या, पण व्हीजेडी पद्धतीच्या आधारावर त्यांना एका धावेने पराभव स्वीकारावा लागला.चाहर रविवारी भारतातर्फे टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात हॅट््ट्रिक घेणारा पहिला भारतीय पुरुष गोलंदाज ठरला होता. मंगळवारी त्याने विदर्भाच्या दर्शन नळकांडे, श्रीकांत वाघ व अक्षय वाडकर यांना डावाच्या अखेरच्या षटकातील चौथ्या, पाचव्या व सहाव्या चेंडूवर बाद केले. मात्र, चौथा चेंडू टाकल्यानंतर त्याने वाइड चेंडू टाकला आणि त्यामुळे त्याला हॅटट्रिक नोंदवण्यापासून मुकावे लागले. राजस्थानने विदर्भला १३ षटकांत ९ बाद ९९ धावांत रोखले. चाहरने या षटकाच्या पहिल्या चेंडूवर रुपेश राठोडलाही बाद केले होते. त्याने ३ षटकांत १८ धावांत ४ बळी घेतले.यानंतर राजस्थानला १०६ धावांचे लक्ष्य मिळाले. मनेंदर सिंगने (४४ धावा, १७ चेंडू, ६ षटकार) संघाला चांगली सुरुवातही करुन दिली. सलामीवीर अंकित लांबाने ११ चेंडूंत प्रत्येकी एक चौकार व षटकारासह १५ धावा केल्या. अरिजित गुप्ताने (१२) दुहेरी आकडा गाठला. संघाचा डाव १३ षटकांत ८ बाद १०५ धावांत रोखला गेला. विदर्भ संघ सर्व चारही सामने जिंकत १६ गुणांसह गटात अव्वल आहे. अन्य सामन्यात केरळने सचिन बेबीच्या ४८ धावांच्या जोरावर मणिपूरविरुद्ध ७५ धावांनी विजय मिळवला. (वृत्तसंस्था)