नीलेश देशपांडेइंदूर : ६० वर्षांत पहिल्यांदा रणजी करंडक जिंकण्यास सज्ज असलेला विदर्भ संघ आज शुक्रवारपासून येथील होळकर स्टेडियमवर दिल्लीविरुद्ध अंतिम सामना खेळणार आहे. भारतीय संघाचे माजी यष्टिरक्षक चंद्रकांत पंडित यांच्या मार्गदर्शनात खेळणा-या विदर्भाचा कर्णधार फैज फझल अॅन्ड कंपनीने प्रतिस्पर्धी संघावर मात करीत ऐतिहासिक विजय साकारल्यास चमत्कार घडेल. दुसरीकडे १० वर्षांनंतर दिल्ली संघ आठव्या जेतेपदासाठी आसुसलेला दिसतो. पाच दिवसांच्या या लढतीत प्रेक्षकांना रोमहर्षक क्रिकेटची अनुभूती होणार आहे.रणजी करंडकात यंदा एका पाठोपाठ एक विजय साकारणारा विदर्भ या स्पर्धेत ‘ छुपा रुस्तम’ ठरला. उपांत्य सामन्यात कर्नाटकसारख्या बलाढ्य संघाला नमविताच विजेतेपदही खेचून नेण्याचा आत्मविश्वास खेळाडूंमध्ये संचारला आहे. कर्णधार गौतम गंभीर आणि कोच केपी भास्कर यांच्यात वाद उद्भवल्यानंतरही दिल्लीच्या खेळाडूंनी सर्वच सामन्यात सरस कामगिरी करीत अंतिम फेरीचा मार्ग प्रशस्त केला आहे. विदर्भाची कामगिरी पाहता दिल्ली संघ फैजच्या संघाला सहजपणे घेण्याची चूक करणार नाही. वेगवान गोलंदाज रजनीश गुरबानी यंदाच्या सत्रातील शोध आहे. त्याने कोलकाता येथे कर्नाटकच्या फलंदाजांना पाणी पाजले. पण गंभीरसह दिल्लीच्या मुरब्बी फलंदाजांना आवर घालणे त्याच्यासाठी आव्हानात्मक असेल.विदर्भाकडून फैज फझलने ७६.६३ च्या सरासरीने ८४३ धावा तर सलामीवीर संजय रामास्वामीने ७३५ धावा ठोकल्या आहेत. मुंबईसाठी अनेक विजेतेपदाची मोलाची भूमिका वठविणारा अनुभवी वसीम जाफर आणि कोच पंडित यांचा अनुभव विदर्भासाठी यंदा मोलाचा ठरला.गंभीरने या सत्रात तीन शतके आणि दोन अर्धशतके नोंदविली आहेत. मध्य प्रदेशविरुद्ध विजयाचा पाठलाग करताना त्याने ९५ धावा आणि बंगालविरुद्ध उपांत्य सामन्यात शतक ठोकले होते. दिल्लीच्या यशस्वी वाटचालीत गंभीरचीच कामगिरी निर्णायक ठरली आहे. युवा सलामीवीर कुणाल चंदेला यानेदेखील उपांत्य सामन्यात शतकी खेळी केली. मधल्या फळीत नितीश राणा उपयुक्त ठरला. सातवेळेचा चॅम्पियन दिल्लीकडे कर्णधार रिषभ पंत हा हुकमी एक्का आहे.फलंदाजीत अपयशी ठरलेल्या पंतने यष्टिरक्षणात मोठी कामगिरी केली. वेगवान गोलंदाज नवदीप सैनी याने सलग बळी घेतले तर डावुखरा फिरकी गोलंदाज विकास मिश्रा याने दिल्लीकडून यंदा सर्वाधिक गडी बाद केले आहेत.>उभय संघयातून निवडणारविदर्भ : फैज फझल (कर्णधार), संजय रामास्वामी, वसीम जाफर, गणेश सतीश, अपूर्व वानखेडे, अक्षय वाडकर, आदित्य सरवटे, अक्षर वखरे, सिद्धेश नेरळ, रजनीश गुरबानी, कर्ण शर्मा, शलभ श्रीवास्तव, सिद्धेश वाठ, अक्षय कर्णवार, सुनिकेत बिंगेवार, रवी ठाकूर, आदित्य ठाकरे.दिल्ली : रिषभ पंत ( कर्णधार), गौतम गंभीर, कुणाल चंदेला, ध्रुव शेनॉय, नितीश राणा, हिम्मत सिंग, मनन शर्मा, विकास मिश्रा, विकास टोकस, नवदीप सैनी, कुलवंज खेजरोलिया, पुलकित नारंग, शिवम शर्मा, उन्मुक्त चंद, मिलिंद कुमार.<कामगिरीवर फोकस‘आमचे लक्ष कामगिरीवर असेल. सामना जिंकण्यासाठी सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्याची जाणीव आहे. प्रतिस्पर्धी संघाने काय केले हे पाहण्यापेक्षा आम्ही काय करू शकतो, यावर आमचा भर असेल. कामगिरीत सातत्य असेलच असे नाही. माझा फॉर्म चिंतेचा विषय नाही. पण अंतिम सामन्यात संघाचे नेतृत्व करणे ही अभिमानास्पद बाब असून दिल्लीला जेतेपदाची भेट द्यायची आहे.’ - रिषभ पंत, कर्णधार दिल्ली.>जेतेपदासह इराणी करंडक खेळण्याचे स्वप्न‘विदर्भ संघाने माझ्या नेतृत्वात अंतिम सामना जिंकून रणजी जेतेपदासह इराणी करंडक खेळावा, अशी इच्छा आहे. आम्ही रणजी करंडक जिंकलो तर संपूर्ण संघ इराणी करंडकात खेळणार आहे. मी सांघिक कामगिरीवर विश्वास ठेवत असल्याने विदर्भाचा प्रत्येक खेळाडू इराणी करंडक खेळावा, असे वाटते. विदर्भ सांघिक कामगिरीच्या बळावर फायनलमध्ये दाखल झाला. अंतिम लढतीतही सांघिक कामगिरी करीत विजेतेपद पटकवू,असा मला विश्वास आहे.’- फैज फझल, कर्णधार विदर्भ.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- विदर्भ संघाची नजर ऐतिहासिक जेतेपदावर
विदर्भ संघाची नजर ऐतिहासिक जेतेपदावर
इंदूर : ६० वर्षांत पहिल्यांदा रणजी करंडक जिंकण्यास सज्ज असलेला विदर्भ संघ आज शुक्रवारपासून येथील होळकर स्टेडियमवर दिल्लीविरुद्ध अंतिम सामना खेळणार आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 12:37 AM