नागपूर : विदर्भ क्रिकेटसाठी २०१७-१८ चा हंगाम ऐतिहासिक ठरला. १६ वर्षे गटाचा विजय मर्चंट करंडक, रणजी करंडकाचे राष्ट्रीय जेतेपद आणि आता १९ वर्षांखालील अ.भा. कूचबिहार करंडक स्पर्धा जिंकून विदर्भ संघांनी तीन जेतेपदाचे वर्तुळ पूर्ण केले.
व्हीसीए सिव्हील लाईन्स स्टेडियमवर मध्य प्रदेशविरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यात पहिल्या डावातील ३२५ धावांच्या मोठ्या आघाडीच्या बळावर बुधवारी विदर्भाने जेतेपदाला गवसणी घातली.
काल तिसºया दिवशी ६ बाद ५७९ या धावसंख्येवरून विदर्भाने अखेरच्या दिवशी आज पुढे सुरुवात केली.मूळचा अकोल्याचा खेळाडू असलेला त्रिशतकवीर अथर्व तायडे हा कसोटीपटू युवराजसिंग याचा सर्वाधिक धावांचा विक्रम मोडित काढणार काय, याबद्दल क्रिकेटप्रेमींमध्ये उत्सुकता होती. मात्र, कालच्या धावसंख्येत तो केवळ सात धावांचीच भर घालून बाद झाल्याने विक्रम मोडू शकला नाही. युवराजने १९९९-२००० मध्ये बिहारविरुद्ध कूचबिहार करंडकाच्या अंतिम सामन्यात ३५८ धावांची विक्रमी खेळी केली होती. युवीचा विक्रम मोडीत काढण्यासाठी अथर्वला ३९ धावा कमी पडल्या. ४८३ चेंडूंचा सामना करणाºया तायडेने ३४ चौकार व एक षटकार मारला. व्हीसीएतर्फे सर्व प्रकारच्या सामन्यात एखाद्या खेळाडूने केलेली ही सर्वोच्च आणि विक्रमी खेळी ठरली.
विदर्भाला या सामन्यात निर्णायक विजयाची संधी होती. दुसºया डावात १७ धावांत मध्य प्रदेशचे दोन गडी बाद करून विदर्भाच्या गोलंदाजांनी त्या दिशेने वाटचालही केली. मात्र संकेत श्रीवास्तव (१७६ चेंडूंत नाबाद ७१ धावा) आणि यश दुबे (९९ चेंडूंत ६७ धावा) यांनी चिवट झुंज देत विदर्भाच्या अपेक्षेवर पाणी फेरले. सामना संपला तेव्हा मध्य प्रदेशने दुसºया डावात ७ बाद १७६ पर्यंत मजल गाठली होती.
सामना संपताच विदर्भ क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अॅड. आनंद जैस्वाल यांच्या हस्ते विजेत्या विदर्भ संघाला कूचबिहार करंडक प्रदान करण्यात आला. याप्रसंगी व्हीसीएचे उपाध्यक्ष प्रशांत वैद्य, सचिव भूपिंदरसिंग भट्टी आणि मध्य प्रदेश क्रिकेट संघटनेचे सहसचिव संदीप मोघरे उपस्थित होते. विदर्भाच्या खेळाडूंनी जल्लोष करीत जेतेपदाचा आनंद साजरा केला.
संक्षिप्त धावफलक
मध्य प्रदेश पहिला डाव : सर्वबाद २८९ धावा. विदर्भ पहिला डाव : १८३.४ षटकांत सर्वबाद ६१४ धावा (अथर्व तायडे ३२०, दर्शन नळकांदे १९, ऋषभ चौहान ४/११९, मोहम्मद साद बग्गड ३/१३९, संकेत श्रीवास्तव २/४९, सूरज वशिष्ठ १/७२.).
मध्य प्रदेश दुसरा डाव : ६३ षटकांत ७ बाद १७६ धावा (संकेत श्रीवास्तव नाबाद ७१, यश दुबे ६७, पार्थ रेखडे ३/४८, दर्शन नळकांदे १/१९, यश ठाकूर १/११, रोहित दत्तात्रय १/४५, अनिरुद्ध चौधरी १/३९).
Web Title: Vidarbha winners in Cooch Behar Corridor
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.