यंदाची आयपीएल एकदम खास ठरली आहे. पावसाचे धुमशान आणि त्यात दोन दिवस संपले तरी चाललेला क्रिकेटचा थरार. चेन्नई आणि गुजरात यांच्यातील अंतिम लढत राखीव दिवस संपला तरी निकाली लागली नव्हती. अखेर मॅच संपायला मंगळवार उजाडला, पहाटे अडीज-पावणेतीनलाच रोमांचक मॅच संपली.
पावसाने व्यत्यय आणला तरी प्रेक्षकांना आयपीएलने खिळवून ठेवले. त्यातले त्यात धोनीच्या संघावर प्रेम करणारे चाहते होते. अखेरच्या ओव्हरपर्यंत रंगलेल्या सामन्याने चाहत्यांच्या डोळ्यात अश्रू आणले होते. तिकडे धोनी निर्विकार चेहऱ्याने बसला होता. अखेरच्या चेंडूवर चार धावा हव्या असताना धोनीची त्या चेंडूकडे पाहण्याचीही हिंमत नव्हती. पण जडेजाने विजयी फटका हाणला आणि धोनीने त्य़ाला चक्क उचलून घेतले.
चेन्नई आणि धोनीसाठी हा पाचवा आयपीएल चषक होता. रविंद्र जडेजाने शेवटच्या दोन चेंडूंवर षटकार आणि चौकार खेचला आणि चेन्नईच्या चाहत्यांचा जीव भांड्यात पडला. तोवर स्टेडिअममध्ये सुरु होती, रडारड आणि देवाचा धावा. गुजरातकडून वेगवान गोलंदाज मोहित शर्माने सुरुवातीचे चार चेंडू जबरदस्त टाकले होते. जवळपास चेन्नईच्या हातून मॅच निघून गेली होती. चाहत्यांच्या चेहऱ्यावर अश्रू वाहू लागले होते.
चेन्नईला अखेरच्या षटकात सामना जिंकण्यासाठी १३ रन्स हवे होते. मोहितने पहिला चेंडू निर्धाव टाकला. पुढील तीन चेंडूंवर तीन धावा आल्या. यामुळे दोन चेंडूंत चेन्नईला १० रन्स हवे होते. चेन्नईच्या चाहत्यांमध्ये सन्नाटा पसरला होता. जो तो रडू लागला होता. तिकडे धोनी देखील निर्विकार चेहऱ्याने खाली नजर घालून बसला होता. जडेजाने षटकार खेचला, एका चेंडूत चार धावा हव्या होत्या. चेन्नईच नाही तर गुजरातचे फॅन्सही टेन्शनमध्ये होते. तितक्यात जडेजाने चौकार खेचला आणि स्टेडिअममध्ये क्षणार्धात दु:खाचे अश्रू आनंदात रुपांतरीत झाले होते.