ट्वेंटी-20 क्रिकेट हा फलंदाजांचा खेळ मानला जातो. त्यामुळे येथे चौकार - षटकारांसह पडणारा धावांचा पाऊस काही नवा नाही. पण, याच ट्वेंटी-20त जर एखाद्या संघाचे 10 फलंदाज अवघ्या 36 धावांत माघारी परतले, असे सांगितले तर विश्वास बसणे थोडसं अवघडच जाईल. त्यात जर त्या 10 फलंदाजांमध्ये दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज खेळाडू एबी डिव्हिलियर्सचा समावेश असेल, तर अशी पडझड पचवणे थोडं अवघडच आहे. पण, बिग बॅश लीगमध्ये एबी प्रतिनिधित्व करत असलेल्या ब्रिस्बन हिट संघावर ही नामुष्की ओढावली आहे.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या मेलबर्न रेनेगॅड्स संघानं 6 बाद 164 धावा केल्या. शॉन मार्श ( 27), बीजे वेस्टर ( 36), मोहम्मद नबी ( 22), सॅम हार्पर ( 21) आणि विल सदरलँड ( 20) यांनी संघाच्या धावसंख्येत हातभार लावला. ब्रिस्बन हिटच्या बेन लॉघलीननं तीन विकेट्स घेतल्या. हे लक्ष्य ब्रिस्बन हिट सहज पार करेल, असा सर्वांना विश्वास होता आणि सॅम हिझलेट व ख्रिस लीन या सलामीवीरांनी तशी दणक्यात सुरुवातही करून दिली होती. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 84 धावा जोडल्या.
कर्णधार ख्रिस लीन 15 चेंडूंत 5 चौकार व 3 षटकार खेचून 41 धावांत माघारी परतला. त्यानंतर ब्रिस्बनच्या डावाला घरघर लागली. त्यांचा संपूर्ण संघ 120 धावांवर माघारी परतला. एबीनं केवळ दोन धावा केल्या. हिझलेट 37 चेंडूंत 7 चौकर व 1 षटकार खेचून 56 धावांवर बाद झाला. कॅमेरून बोयसनं सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. त्याला समीत पटेल व डॅनिएल ख्रिस्टीयन यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेत उत्तम साथ दिली.
पाहा व्हिडीओ...