Duleep Trophy Final 2022 : २० वर्षीय यशस्वी जैस्वालने ( Yashasvi Jaiswal) आज ऐतिहासिक खेळी केली. वेस्ट झोन विरुद्ध साऊथ झोन ( West Zone vs South Zone Final) यांच्यात दुलीप चषक क्रिकेट स्पर्धेची अंतिम लढत सुरू आहे. साऊथ झोनने पहिल्या डावात ५७ धावांची आघाडी घेत वेस्ट झोनला बॅकफूटवर फेकले, परंतु त्यांनी दुसऱ्या डावात शानदार खेळ केला आणि ३१५ धावांची भक्कम आघाडी घेतली आहे. यात यशस्वीच्या द्विशतकाचा समावेश आहे. यशस्वीने शुक्रवारी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी द्विशतक झळकावताना १९६२ साली अजित वाटेकर यांनी नोंदवलेला विक्रम मोडला. हेत पटेल ( ९८) व जयदेव उनाडकत ( ४७) यांनी पहिल्या डावात वेस्ट झोनला सावरले आणि २७० धावांपर्यंत पोहोचवले. साऊथ झोनच्या आर साई किशोरने ८६ धावांत ५ विकेट्स घेतल्या. बसिल थम्पी व सी स्टीफन यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. साऊथ झोनच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी केली. बाबा अपराजितने १२५ चेंडूंत १४ चौकारांसह ११८ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. मनिष पांडे ( ४८), कृष्णप्पा गौथम ( ४३) व रवी तेजा ( ३४) यांनी साऊथ झोनच्या धावसंख्येत हातभार लावला. साऊथ झोनला पहिल्या डावात ३२७ धावा करता आल्या. जयदेवने ४, अतित शेठने ३ व चिंतन गजाने २ विकेट्स घेतल्या. दुसऱ्या डावातही कर्णधार अजिंक्य रहाणए ( १५) अपयशी ठरला. यशस्वी व प्रियांक पांचाळ यांनी पहिल्या विकेटसाठी ११० धावांची भागीदारी करून वेस्ट झोनला चांगली सुरुवात करून दिली. प्रियांक ४० धावांवर बाद झाला. त्यानंतर यशस्वी व श्रेयस अय्यरची जोडी जमली. त्यांनी तिसऱ्या विकेटसाठी १६७ धावांची भागीदारी करताना संघाला तीनशेपार नेले. श्रेयस ११३ धावांत ४ चौकार व २ षटकारांसह ७१ धावांवर बाद झाला, परंतु यशस्वी खिंड लढवतोय... त्याने २४४ चेंडूंत २३ चौकार व ३ षटकारांसह २०९ धावा करताना संघाला ३ बाद ३७६ धावांपर्यंत पोहोचवले आहे. वेस्ट झोनने आता ३१९ धावांची आघाडी घेतली आहे. यशस्वीने दुलीप चषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत नॉर्थ इस्ट झोनविरुद्धही द्विशतक झळकावले होते. प्रथम श्रेणी क्रिकेटच्या अंतिम सामन्यात द्विशतक झळकावणारा तो भारताचा युवा फलंदाज ठरला. अजित वाडेकर यांनी १९६२ मध्ये राजस्थान विरुद्ध २० वर्ष व ३५४ दिवसांचे असताना द्विशतक झळकावले होते. यशस्वी आज २० वर्ष व २६९ दिवसांचा आहे.