लंडनः दक्षिण अफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्स आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. परंतु इंग्लंडमधील ट्वेंटी- 20 ब्लास्ट लीगमध्ये तो मैदान गाजवत आहे.
इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या ट्वेंटी- 20 ब्लास्ट लीगमध्ये डिव्हिलियर्स मिडलसेक्स संघाकडून खेळतो आहे. त्याने रविवारी झालेल्या समरसेट विरुद्धच्या सामन्यात जोरदार फलंदाजी करत 35 चेंडूत 9 षटकार व 1 चौकारच्या सहाय्याने 88 धावा केल्या. या धावांसोबतच त्याने ट्वेंटी- 20 क्रिकेटमध्ये 8000 धावांचा टप्पा पार केला. त्याला शेवटच्या षटकात फलंदाजी करण्यास संधी न मिळाल्याने शतक पूर्ण करु शकला नाही. तसेच डेव्हिड मलानच्या 56 धावांच्या जोरावर मिडिलसेक्सने 4 विकेट्सच्या मोबदल्यात 215 धावांचे लक्ष्य उभारले.
धावांचा पाठलाग करताना समरसेट संघ 180 धावातच गुंडाळला. समरसेटकडून खेळताना टॅाम बेंटन आणि टॅाम एबल यांनी प्रत्येकी 41 धावा केल्या. तसेच मिडलसेक्सकडून नाथन सोटर याने 29 धावा देत 4 विकेट्स घेतल्या.
तसेच ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम ख्रिस गेलच्या ( 12808 धावा) नावावर आहे. त्यानंतर ब्रेंडन मॅकलम ( 9922), किरॉन पोलार्ड ( 9373), डेव्हिड वॉर्नर ( 8803) आणि शोएब मलिक ( 8701) यांचा क्रमांक येतो. भारतीय फलंदाजांत कोहली 254 डावांत 8416 धावांसह अव्वल स्थानी आहे. त्यानं सुरेश रैनाचा सर्वाधिक 8392 धावांचा विक्रम रविवारी मोडला. जगभरातील ट्वेंटी-20 क्रिकेटपटूंमध्ये त्यानं सहावे स्थान पटकावले आहे.