कोरोना व्हायरसमुळे देशात लॉकडाऊन जाहीर केला गेला आहे. कोरोना व्हायसशी मुकाबला करण्यासाठी क्रीडापटू, उद्योगपती पुढे आले आहेत आणि ते केंद्र व राज्य सरकारला आर्थिक मदत करत आहेत. भारताचा फलंदाज अजिंक्य रहाणे यानेही महाराष्ट्र राज्य सरकारला 10 लाखांची मदत जाहीर केली. पण, या लॉकडाऊनच्या काळात सर्व व्यवहार ठप्प असल्यानं अनेक शेतकऱ्यांना त्यांचं उत्पादन रस्त्यावर फेकून द्यावं लागत आहे. मात्र, अजिंक्य रहाणेनं सोशल मीडियावर तुळजापूरच्या एका शेतकऱ्याचा व्हिडीओ पोस्ट करून त्याचं कौतुक केलं. रहाणेनं असं का केलं, हे माहित पडल्यावर तुम्हीही त्या शेतकऱ्याला कडक सॅल्यूट ठोकाल.
अजिंक्य रहाणे बनला 'शेतकरी मित्र'; महिंद्रा ग्रुपसोबत केली मोठी गुंतवणूक
कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी देशातील अनेक क्रीडापटू पुढे आले आहेत. गौतम गंभीरनं त्याच्या खासदार निधीतून 1 कोटींची मदत आणि दोन वर्षांचा पगार दान केला. सचिन तेंडुलकर आणि सुरेश रैना यांनी अनुक्रमे 50 व 52 लाखांचा निधी पंतप्रधान व मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) 51 कोटी रुपये पंतप्रधान सहाय्यता निधीत जमा केला. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीही गरिबांसाठी काम करत आहे आणि त्यानं 50 लाख किमतीचे तांदूळ दान केले. अजिंक्य रहाणे, मेरी कोम, बजरंग पुनिया, पी व्ही सिंधू, हिमा दास आदी क्रीडापटूही पुढे आले आहेत.
शेतकरी काय सांगतोय ते ऐका....''कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी सर्व स्तरातून मदतीचा ओघ येत आहे. कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वारंवार आपल्याला घरीच राहण्याची कळकळीची विनंती करत आहेत. त्यांची ही विनंती योग्य आहे, परंतु गरीब कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. मी शेतकरी आहे आणि मी आर्थिक मदत करू शकत नाही. पण, माझी दोन एकर केळीची शेती आहे. त्यामुळे माझ्या शेतातील केळी काढणीला आली आहेत आणि ही केळी मी त्या गरजूंनी देऊ इच्छितो. शासनाला माझी विनंती आहे की त्यांनी ही केळी घेऊन जावी आणि गरिबांना द्यावी. किमान त्यांचं एक वेळेची भूक मिटेल,'' असे उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील शेतकऱ्यानं सांगितले. त्याच्या या पुढाकाराचं टीम इंडियाच्या कसोटी संघाचा उपकर्णधार रहाणेनं कौतुक केलं आहे.
रहाणेनं या शेतकऱ्याचं कौतुक केलं, त्यानं लिहिलं की,''तुमच्याकडे किती आहे यापेक्षा तुम्ही किती देता, हे महत्त्वाचे आहे. कोरोना व्हायरसच्या संकट काळात तुळजापूरच्या शेतकऱ्याच्या या पुढाकाराचे कौतुक.''
अन्य महत्त्वाचा बातम्या
पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला क्रीडापटूंची साथ; सचिनपासून ते मेरी कोमपर्यंत सारे झाले सहभागी!
आफ्रिदीच्या मदतीसाठी आवाहन करणाऱ्या युवराज सिंगचं लाखोंचं दान
हरभजन सिंग अन् त्याच्या पत्नीची समाजसेवा; 5000 कुटुंबांना पुरवणार रेशन