मुंबई - देशातील गर्भश्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांनी उभारलेल्या निता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरला सेलिब्रिटींसह दिग्गजांची उपस्थिती होती. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवी, अनेक मंत्री, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह सिनेस्टार आणि क्रिकेटचा देव भारतरत्न सचिन तेंडुलकरही हजर होते. सचिन आणि अंबानी कुटुंबीयांचे संबंध हे घरातील सदस्यांप्रमाणे आहेत. त्यामुळे, मुकेशभाई आणि निता भाभी असं म्हणून सचिन नेहमीच अंबानी कुटुंबीयांच्या सोहळ्याला उपस्थित असतो.
मुंबईत नुकतेच पार पडलेल्या NMACC च्या उद्घाटन सोहळ्यातही सचिनही हजेरी लक्षणीय ठरली. या सोहळ्यात सचिन पत्नी डॉ. अंजलीसह उपस्थित होता. यावेळी, अँकर अनुषा दांडेकरने सचिनला भेटून या सोहळ्याबद्दल आणि अंबानी कुटुंबीयांबद्दल प्रश्न केला. त्यावर, सचिनने मनमोकळेपणे उत्तर दिले. हे कल्चरल सेंटर अतिशय दर्शनीय असल्याचं सचिनने म्हटले. तसेच, मुकेश अंबानी आणि निता अंबानी यांचंही कौतुक केलं. हे अद्भूत आहे, मुकेश भाई आणि निता भाभी जे काही करतात ते अतिशय कमालीचं असतं. याची भव्यता आणि भारतीय संस्कृतीचा हा उत्सव, ही सुंदर क्षणांची सुरुवात असल्याचं सचिनने म्हटले.
सचिनच्या उत्तरानंतर अँकर अनुषा दांडेकरने सचिन सर म्हणत थँक्यू म्हटले. त्यानंतर, अनपेक्षितपणे सचिनला जादू की झप्पी दिली. त्यावेळी, अचानकपणे अंकरची जादू की झप्पी मिळाल्याने सचिनही जरासा लाजल्याचं दिसून आलं.
दरम्यान, अंबानींच्या या सोहळ्याची सध्या सर्वत्र चर्चा होत असून बॉलिवूड स्टार आणि दिग्गजांची मांदीयाळी याठिकाणी जमली होती. त्यामुळे, या सोहळ्यातील अनेकांचे फोटो समाजमाध्यमातून समोर आले आहेत.