अफगाणिस्तानचा १९ वर्षीय फलंदाज आरिफ संगरने ( Arif Sangar ) आपल्या तुफानी फलंदाजीने दहशत निर्माण केली आहे. आरिफने युरोपियन क्रिकेट मालिकेतील T10 सामन्यात केवळ २९ चेंडूत धडाकेबाज शतक झळकावले. आरिफने ३५ चेंडूत ११८ धावांच्या खेळीत एकूण २ चौकार आणि १७ षटकार ठोकले.
ECS स्वित्झर्लंड T10 लीग सामन्यात पॉवर सीसी विरुद्ध पख्तून जाल्मीकडून खेळत असलेल्या आरिफ संगरने ३३७.१४ च्या स्ट्राइक रेटने खेळ केला. आरिफने केवळ २९ चेंडूत शतक झळकावून नवा इतिहास रचला. आरिफने एका षटकात २९ धावा चोपल्या. आरिफने ९७ धावांवर खेळत षटकार ठोकून शतक पूर्ण केले. आरिफच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर पख्तुन जाल्मीने १० षटकांत ३ बाद १८५ धावा उभ्या केल्या आणि प्रत्युत्तरात पॉवर सीसीचा संघ १०३ धावांत तंबूत परतला.
T20 क्रिकेटमधील सर्वात जलद शतकाचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. त्याने २०१३च्या IPL मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळताना पुणे वॉरियर्सविरुद्ध अवघ्या ३० चेंडूंमध्ये शतक झळकावले होते. गेलने आपल्या झंझावाती शतकी खेळीत १७ षटकार आणि २ चौकार लगावले होते. आरिफ संगरने भलेही गेलपेक्षा कमी चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले असेल, परंतु T20 मध्ये सर्वात जलद शतकाचा विक्रम अजूनही गेलच्या नावावर आहे, कारण आरिफने टी10 क्रिकेटमध्ये हा पराक्रम केला आहे.