Arjun Tendulkar batting Video: सचिन तेंडुलकर हे क्रिकेटमधील बडे नाव. सचिनने (Sachin Tendulkar) केलेले विक्रम आणि पराक्रम भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत अनेकवेळा शानदार खेळी करून संघाला तारले आहे. आता त्याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर यादेखील त्याच्यासारखी कामगिरी करण्याचा प्रयत्न करताना दिसतो आहे. अर्जुनने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर अनेक व्हिडिओ पोस्ट केले आहेत. त्यात तो चौकार-षटकारांचा वर्षाव करताना दिसतोय. अर्जुनच्या या स्फोटक खेळीमुळे त्याने संघाचीही लाज राखली आहे. निम्मा संघ स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर तो संघासाठी खेळून चांगली फटकेबाजी करतोय हे व्हिडीओमधील स्कोअरकार्ड पाहून स्पष्ट होत आहे.
अर्जुनची दोन दमदार अर्धशतके
अर्जुन तेंडुलकरने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये संघाचे स्कोअरकार्ड दिसते. अर्जुन ५ धावांवर असताना त्याच्या संघाची अवस्था ५ बाद ८७ धावा अशी असते. पुढील व्हिडिओमध्ये, त्याच्या संघाची धावसंख्या ९ बाद २१९ झाल्याचे दिसते आणि त्यात अर्जुन ४७ धावांवर खेळताना दिसतो. मोठा फटका खेळून अर्धशतक ठोकतो. षटकारासह तो ६० चेंडूत फिफ्टी झळकावतो. संघाच्या पुढील डावातही अर्जुन ४ धावांवर खेळताना संघाची धावसंख्या ५ बाद १२९ असते. नंतर अर्जुन ६१ धावांवर खेळताना दिसतो आणि संघाची धावसंख्या ७ बाद १८८ धावा असते. हे स्कोअर आणि व्हिडिओ पाहता, असे म्हणता येईल की अर्जुनने संघाची लाज वाचवली.
IPLमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून अर्जुन तेंडुलकर खेळतो. पण गेल्या दोन वर्षात त्याला संघाबाहेर बाकावर जास्तवेळ बसवून ठेवण्यात आले आहे. तसेच त्याला प्रामुख्याने गोलंदाज म्हणून खेळवले जाते. त्यामुळे आता फलंदाजीत अर्जुनने केलेली सुधारणा पाहता त्याला मुंबईचा संघ ऑलराऊंडर म्हणून प्लेइंग ११ मध्ये घेणार का? याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष आहे.