SA vs ENG Video : क्रिकेट सामन्यात फलंदाज अचूक टायमिंगने शॉट्स मारुन जास्तीत जास्त धावा मिळवण्याच्या प्रयत्नात असतो, तर गोलंदाज विकेटच्या शोधात असतो. पण कधी कधी अचूक टायमिंगही घात करते. असाच काहीसा प्रकार दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यात घडला आहे. एका फलंदाजाने उत्कृष्ट स्वीप शॉट मारला, पण या शॉटमुळे तो धावबाद झाला आणि तोही अतिशय विचित्र पद्धतीने.
बॉल थेट हेल्मेटला लागला अन्...दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडच्या 19 वर्षांखालील संघांमध्ये कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यातच एक विचित्र पण भीतीदायक घटना घडली, ज्याने सर्वांनाच चिंतेत टाकले. एका फटक्यात दोन्ही संघ अडचणीत आले. इंग्लंडचा फलंदाज आर्यन सावंत खेळत होता, तर 16 वर्षीय डावखुरा फिरकी गोलंदाज जेसन रॉल्स गोलंदाजी करत होता. रॉल्सच्या चौथ्या चेंडूवर उजव्या हाताच्या सावंतने स्वीप शॉट खेळला. यावेळी जोरिच व्हॅन शाल्विक शॉर्ट लेगवर तैनात होता. फलंदाजाने मारलेला बॉल थेट त्याच्या हेल्मेटला लागला. शॉट खेळताच फलंदाज क्रिजच्या बाहेर आला होता, तेवढ्यात बॉल हेल्मेटला लागून थेट स्टंपला लागला. सावंतला काही कळायच्या आत तो धावबाद झाला.
फील्डरच्या डोक्याला दुखापत झालीदक्षिण आफ्रिकेचे खेळाडू धावबाद झाल्याचा आनंद साजरा करू लागले. पण त्यांचे सेलिब्रेशन लगेच फिके पडले, कारण बॉल शाल्विकच्या डोक्याला इतका जोरात लागला की, तो लगेच मैदानात पडला. यानंतर तात्काळ वैद्यकीय पथकाला मैदानात बोलवण्यात आले. सुदैवाने त्याला गंभीर दुखापत झाली नाही. यानंतर सामना सुरू ठेवण्यात आला.