नवी दिल्ली - भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन बराच काळ झाला आहे. मात्र आजही त्याचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. केवळ भारतातच नाही तर विदेशातील लोकांना देखील धोनीने आपल्या खेळीने भुरळ घातली आहे. सध्या धोनी लंडनमध्ये आहे तिथे सेल्फी घेण्यासाठी धोनीभोवती चाहत्यांची गर्दी होत आहे. याचाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
दरम्यान, धोनीचा व्हायरल होत असलेला व्हिडीओ धोनीच्या नावाने अकाउंट असलेल्या त्याच्या एका चाहत्याने ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये धोनी लंडनच्या रस्त्यावर फेरफटका मारताना दिसत आहे आणि त्याच्या सोबत अनेक चाहत्यांची वरदळ पाहायला मिळत आहे. सर्वंच चाहत्यांची सेल्फी घेण्यासाठी धोनीभोवती झुंबड उडाली आहे. विशेष म्हणजे काही चाहते तर धावत धावत सेल्फी घेत आहेत.
भारतीय संघ सध्या इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळत आहे, धोनीदेखील लंडनमध्येच आहे. भारत-इंग्लंड सामन्यादरम्यान तो स्टेडियममध्ये पाहायला मिळतो. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने त्याचे काही फोटो देखील शेअर केले आहेत, ज्यामध्ये तो भारताचे युवा खेळाडू आणि स्टाफ सोबत चर्चा करत आहे.
भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून धोनीची जगभर ख्याती आहे. धोनीने २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतला होता. एकदिवसीय क्रिकेटमध्ये धोनीच्या नावावर १० हजारांहून अधिक धावांची नोंद आहे. लक्षणीय बाब म्हणजे धोनीच्याच नेतृत्वात भारतीय संघाने टी-२० विश्वकप, एकदिवसीय विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी यांसारखे मोठे चषक जिंकले आहेत. सध्या धोनी आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार आहे.