ब्रिस्बेन : गाबाच्या मैदानात ऑस्ट्रेलियाने ३२ वर्षांत पराभव बघितलेला नाही. ब्रिस्बेनच्या गाबा स्टेडियममध्ये सलग २८ कसोटी सामने सहज जिंकले, अशा प्रकारच्या फुशारक्या मारणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाला अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात भारतीय युवा ब्रिगेडने जबरदस्त हादरा दिला आणि कांगारूंना चारीमुंड्या चीत केले. अनुभवी आणि दिग्गज खेळाडू जखमी असताना नवख्या चहेऱ्यांनी जिद्दी खेळ करीत ऑस्ट्रेलियाचे ‘गर्वाचे घर खाली’ केले.
क्रिकेटमध्ये काहीही घडू शकते हे देखील जखमी भारतीय वाघांनी चौथ्या आणि अखरेच्या कसोटी सामन्यात अखेरच्या दिवशी खरे करून दाखविले. ३२८ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या भारताने ऑस्ट्रेलियाचा ३ गड्यांनी दणदणीत पराभव केला. कसोटी मालिकाही २-१ अशा फरकाने खिशात घातली. भारताच्या या अभूतपूर्व यशानंतर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि अजिंक्य रहाणे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यामध्ये ज्येष्ठ क्रीडा पत्रकार सुनंदन लेले यांनी दोघांना चक्क मराठीत प्रश्न विचारत संवाद साधला. सुनंदन लेले यांच्या या प्रश्नाला प्रतिसाद अजिंक्य रहाणेसह रवी शास्त्री यांनी देखील मराठीत उत्तर दिले.
७० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला -
भारताने ऑस्ट्रेलियाची ३२ वर्षांची मक्तेदारी मोडीत काढून सलग दुसऱ्यांदा त्यांच्याच भूमीत पराभूत करण्याचा पराक्रम केला. गाबा मैदानावर आतापर्यंत २५० पेक्षा अधिक धावांचे लक्ष्य कोणत्याही संघाला गाठता आले नव्हते. १९५१ मध्ये वेस्टइंडीजने ऑस्ट्रेलियाविरुद्ध येथे २३६ धावांचे लक्ष्य गाठले होते. मात्र, भारतीय संघाने मंगळवारी ऐतिहासिक विजयासह वेस्ट इंडिजचा ७० वर्षांपूर्वीचा विक्रमही मोडला आहे.
यापेक्षा सरस काहीच नाही : रवी शास्त्री
ऑस्ट्रेलियाचा हा दौरा आतापर्यंतचा सर्वांत खडतर दौरा असल्याचे सांगितले. ते म्हणाले,‘हा सर्वांत खडतर दौरा होता. यापेक्षा सरस काहीच नाही. ३६ धावांत बाद झाल्यानंतर हे सर्व अवास्तविक भासत आहे. पराभव मानने आमच्या शब्दकोषात नाही.’
बीसीसीआयकडून पाच कोटींचा बोनस -
विजयश्री खेचून आणणाऱ्या भारतीय संघाचे अभिनंदन करताना, बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शहा यांनी घोषणा करीत पाच कोटींचा बोनस जाहीर केला आहे. या विजयाची कोणत्याही आकड्यामध्ये तुलना करता येणार नाही. सर्व खेळाडू खूप छान खेळले. हा भन्नाट विजय आहे. ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन अशा प्रकारे मालिका विजय मिळविणे. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात हे कायम लक्षात ठेवलं जाईल, अशा शब्दांमध्ये गांगुली यांनी विजयानंतर आनंद व्यक्त केला.
हा सांघिक कामगिरीचा विजय - अजिंक्य रहाणे
“आजचा विजय आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. विजयाचे शब्दात वर्णन करणे कठीण आहे. संघातील सर्व खेळाडूंचा अभिमान वाटतो. आम्हाला सर्वोत्तम कामगिरी करून दाखवायची होती. फलंदाजीसाठी उतरलो तेव्हाच जिंकण्यासाठी खेळायचे हे ठरवले होते. खेळपट्टीवर आम्ही सर्वस्व पणाला लावले. त्यामुळे हा सांघिक कामगिरीचा विजय ठरला”, असं अजिंक्य रहाणे याने सांगितले.
Web Title: Video: Captain Ajinkya Rahane and head coach Ravi Shastri interacted with the media in Marathi
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.