टीम इंडियाचा क्रिकेटर रिषभ पंतच्या कारला आज पहाटे भीषण अपघात झाला. हा अपघात एवढा भयानक होता की त्याची मर्सिडीज कार डिव्हाय़डरला आदळून पूर्णपणे जळून खाक झाली. आता या अपघाताचे व्हिडीओ आले आहेत. यामध्ये सीसीटीव्हीचे फुटेजही आहे. तर अपघातानंतर व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्यांना जखमी व्यक्ती कोण होता हे माहितही नव्हते, असे दिसून आले आहे.
Rishabh Pant Car Accident: रिषभ पंत एकटाच कारमध्ये अडकलेला, आग लागली; लोकांनी काच फोडली अन्...रिषभ पंत एकटाच कारमध्ये होता. तोच कार चालवत होता, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. रिषभ पंत अपघातानंतर कारमध्येच अडकला होता. यानंतर लगेचच कारने पेट घेतला. हायवेवरून जाणाऱ्या वाहनचालकांनी थांबून त्याच्या कारची काच तोडली आणि रिषभला बाहेर काढले. रिषभला डिव्हायडरवर झोपविण्यात आले होते. तेव्हाचा व्हिडीओ समोर आला आहे.
सीसीटीव्ही फुटेजनुसार रिषभ पंतची कार लोखंडी पाईपच्या डिव्हायडरवर अत्यंत वेगाने आदळताना दिसत आहे. तसेच त्यानंतर ही कार हवेतच जोरात उडून पलिकडे जाताना दिसत आहे. यानंतरच्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती व्हिडीओ रेकॉर्ड करत रस्त्याच्या पलीकडून पंतची कार जळताना दाखवत आहे. याचवेळी एक व्यक्ती अपघातात जखमी झाल्याचे म्हणत डिव्हाडरवर काही लोकांनी झोपवलेली व्यक्ती विव्हळताना दिसत आहे.
कसा घडला अपघात...नवी दिल्लीहून रिषभ पंत हा उत्तराखंडच्या रुरकीला जात होता. यावेळी वाटेत सव्वा पाचच्या सुमारास त्याची कार वेगाने नारसन बॉर्डरवरील रेलिंगवर आदळली. कारचे दरवाजे जाम झाल्याने रिषभ आतच अडकला होता. त्याच्या डोक्याला मार लागला होता. पाठीलाही जखमा झाल्या आहेत. कारच्या खिडकीची काच फोडून बाहेर काढल्यानंतर रिषभला लोकांनी तातडीने रुडकीच्या सक्षम हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. उत्तराखंडचे डीजीपी अशोक कुमार यांनी सांगितले की, रिषभच्या शरीराला जास्त जखमा नाहीत, परंतू त्याचा एक पाय फ्रॅक्टर असण्याची शक्यता आहे. त्याला देहरादूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले होते, आता त्याला दिल्लीला नेण्यात येत आहे.