मायकल नेसेर ( Michael Neser ) हे नाव कालपर्वापर्यंत अनेकांनी ऐकलेही नसेल, परंतु कालपासून सोशल मीडियावर अन् अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंच्या तोंडावर हेच नाव आहे... त्यामागे कारणही तसेच आहे. नियमाच्या चौकटीत राहून या ऑस्ट्रेलियन खेळाडूने असा एक अफलातून झेल घेतलाय की ज्याचं कौतुक सारेच करत आहेत. पण, त्याचवेळी त्याच्या या कॅचवरून नियम बदलण्याची मागणी कम टीका होत आहे.. बिग बॅश लीगमध्ये ब्रिस्बेन हिट व सिडनी सिक्सर्स यांच्यातल्या सामन्यात नेसेरने हा अविश्वसनीय झेल घेतला. सीमारेषेबाहेरून त्याने जे काही कौशल्य दाखवले, ते पाहून सारेच चक्रावले आहेत. त्यावरून मतमतांतर पाहायला मिळत आहेत. ब्रिस्बेन हिटने हा सामना १५ धावांनी जिंकला.
२२५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना २३ चेंडूत ४१ धावांची खेळी करणाऱ्या जॉर्डन सिल्कचा अफलातून झेल नेसेरने घेतला अन् सामन्याला कलाटणी दिली. सिल्कने तीन चौकार व दोन खणखणीत षटकार खेचून सिक्सर्सच्या विजयाच्या आशा कायम ठेवल्या होत्या. त्याने असाच एक मारलेला फटका षटकारच गेला होता, परंतु नेसेरने चतुराईने त्याचे रुपांतर झेलमध्ये केले. डीपला उभ्या असलेल्या नेसेरने सीमारेषेजवळ झेल घेतला, परंतु तोल जात असल्याचे समजताच त्याने चेंडू पुन्हा हवेत फेकला..
त्याने फेकलेला चेंडू सीमारेषेबाहेरच पडणार होता, परंतु त्याचवेळी नेसेर पुन्हा हवेत झेपावला चेंडू टीपला अन् पाय जमिनीवर टेकण्याआधी तो पुन्हा सीमारेषेच्या आतल्या दिशेने हवेत फेकला. नेसेर पुन्हा आत आला अन् तो चेंडू टिपला. अम्पायरला नियमानुसार फलंदाजाला बाद द्यावे लागले. पण, यावरून वाद सुरू झाला आहे. नेसेर हा पंजाब किंग्सचा माजी खेळाडू आहे.
नियम काय सांगतो?मेरीलेबॉन क्रिकेट क्लबच्या नियम १९.५.२ नुसार सीमारेषेबाहेर खेळाडूचा पाय जमिनिवर टेकलेला नसेल अन् त्याने चेंडू पुन्हा हवेत फेकून तो सीमारेषेच्या आत येऊन टिपला असेल तर फलंदाज बाद ठरेल.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"