ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये मागील 24 तासांत तीन हॅटट्रिक्सची नोंद झाली. 2020मधील पहिल्या हॅटट्रिकचा मान अफगाणिस्तानच्या रशीद खाननं पटकावला. त्यापाठोपाठ दुसऱ्याच सामन्यात पाकिस्तानच्या हॅरिस रौफनं सलग तीन विकेट्स घेतल्या. आज यात न्यूझीलंडच्या विल विलियम्सची भर पडली आहे. न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या सुपर स्मॅश लीगमध्ये त्यानं हॅटट्रिक नोंदवली.
ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या बिग बॅश लीगमध्ये ( BBL) ही वर्षातील पहिली हॅटट्रिक नोंदवली गेली. अॅडलेड स्ट्रायकर संघाच्या रशीद खाननं सिडनी सिक्सर्सविरुद्ध हॅटट्रिक घेत 2020मधील सर्वप्रथम सलग तीन विकेट घेणाऱ्या गोलंदाजाचा मान पटकावला. या सामन्यातनंतर मेलबर्न स्टार्स आणि सिडनी थंडर्स यांच्यातील लढीतही हॅटट्रिक नोंदवली गेली. जबरदस्त फॉर्मात असलेल्या हॅरिस रौफनं ही हॅटट्रिक नोंदवली. त्यानं थंडर्सच्या 3 फलंदाजांना माघारी पाठवून पुन्हा एकदा संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.
त्यानंतर विलियम्सनं कँटेरबरी संघाचे प्रतिनिधित्व करताना हा पराक्रम केला. वेलिंग्टन संघाविरुद्धची ही लढत कँटेरबरी संघानं अवघ्या 3 धावांनी जिंकली. कँटेरबरीनं 8 बाद 148 धावा केल्या होत्या, प्रत्युत्तरात वेलिंग्टन संघाला 18 चेंडूंत 23 धावांची गरज होती. त्यांचे पाच फलंदाज शिल्लक होते. पण, विलियम्सनं सामना फिरवला. त्यानं 18व्या षटकाच्या अखेरच्या तीन चेंडूंवर वेलिंग्टनच्या तीन फलंदाजांना माघारी पाठवले. त्यानंतर 20व्या षटकाच्या अखेरच्या दोन चेंडूंत दोन फलंदाज बाद करून कँटेरबरीचा विजय पक्का केला. विलियम्सनं 12 धावा देत 5 विकेट्स घेतल्या.