ढाका - बांगलादेश प्रीमिअर लीगमध्ये बुधवारी अजब फटकेबाजी पाहायला मिळाली. ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरने आक्रमक फलंदाजी करताना अर्धशतक पूर्ण केले. पण त्याचे हे अर्धशतक एका खास कारणाने निराळे ठरले. सिलहट सिक्सर्स संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वॉर्नरने चक्क उजव्या हाताने फटकेबाजी केली. त्याची ही आतषबाजी पाहून ट्वेंटी-20 स्पेशालिस्ट ख्रिस गेललाही घाम फुटला.
सिक्सर्स आणि रंगपूर रायडर्स यांच्यातील सामना बुधवारी खेळवण्यात आला. प्रथम फलंदाजी करताना सिक्सर्सने 20 षटकांत 5 बाद 187 धावांचा डोंगर उभा केला. लिटन दास आणि शब्बीर रहमान यांनी संघाला मजबूत सुरुवात करून दिली. शब्बीर (20) माघारी परतल्यानंतर दास आणि वॉर्नर यांनी रायडर्सच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. दासने 43 चेंडूत 9 चौकार व 1 षटकार खेचत 70 धावा चोपल्या. त्यानंतर वॉर्नरनेही अर्धशतक केले.
पण अर्धशतका समीप आल्यावर वॉर्नरने चक्क आपला बॅटींग स्टान्स बदलला. गेलच्या गोलंदाजीचा सामना करण्यासाठी वॉर्नरने उजव्या हाताने फलंदाजी केली. त्याने गेलच्या गोलंदाजीवर दोन चौकार आणि एक षटकार खेचून अर्धशतक पूर्ण केले. वॉर्नरची ही फतकेबाजी पाहून गेलही स्तब्ध झाला. वॉर्नरने 36 चेंडूत 61 धावा केल्या. त्यात 6 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता.
पाहा व्हिडीओ...