मुंबई - भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्या उपांत्य सामना रोमहर्षक झाला. सुरुवातीला 3 बाद 5 अशी धावसंख्या असतानाच आता हार्दीक पंड्या आणि धोनीवर कोट्यवधी भारतीयांच्या आशा होत्या. मात्र, रिषभ पंत पाठोपाठ दिनेश कार्तिक बाद आणि हार्दीक पंड्याही तंबुत परतला. त्यामुळे आता विराट संघाची मदार केवळ कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीवर अवलंबून होती. धोनी शेवटपर्यंत असेल तरच सामना भारत जिंकेल, असे चाहत्यांना वाटत होते. धोनीच्या साथीला रविंद्र जडेजा खेळत होता. मात्र, अखेरच्या क्षणात धोनी बाद झाला अन् सामना किवींनी जिंकला.
6 बाद 92 धावांवरुन महेंद्रसिंह धोनी आणि रविंद्र जडेजाने उत्कृष्ट खेळा केला. धोनी आणि रविंद्र जडेजाने 116 धावांची शानदार भागिदारी करुन टीम इंडियाला विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवले होते. रविंद्र जडेजाने 77 धावांची खेळी करताना उत्तुंग षटकार लावले. या दोघांचा खेळ पाहून भारतीय चाहत्यांमध्येही कमालीचा उत्साह संचारला होता. आता, भारत जिंकणार, अशी आशा ठेवून प्रत्येकजण टीव्हीकडे डोळे लावून बसला होता. तितक्यात उंच फटका मारण्याच्या नादात रविंद्र जडेजा झेलबाद झाला. जडेजानंतर धोनीने एक षटका ठोकत पुन्हा सामन्यात उत्कंठा वाढवली होती. मात्र, पुढच्याच चेंडूवर दोन धावा घेण्याच्या प्रयत्नात धोनी धावबाद झाला. थेट स्टंप उडविणारा थ्रो लागला आणि भारतीयांच्या काळजाचा ठोका चुकला. एक क्षणात गेम चेंज झाला. भारत पुन्हा पराभवाच्या छायेत गेला. भारतीय चाहत्यांना धोनी आऊट झाल्याचा धक्का सहनच झाला नाही. अनेकांनी अश्रूंना वाट मोकळी केली. तर धोनीही पहिल्यांदाच एवढा हताश मैदानावर दिसला. पॅव्हेलियनमध्ये रोहित शर्मालाही रडू कोसळले. तर, घराघरातील आनंदावर विरजन पडले.
पाहा व्हिडीओ -
धोनी बाद झाल्यानंतरचा एका घरातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक चिमुकला मोठ-मोठ्यानं रडताना दिसून येतोय. तर, त्याची बहीण त्याची समजूत काढताना दिसत आहे. मन हेलवणारा आणि धोनीबद्दल चिमुकल्यांपासून ते वृद्धांपर्यंत असलेला विश्वास दर्शवणारा हा व्हिडीओ आहे. सचिन बाद झाल्यानंतर कधीकाळी अशा घटना घडत होत्या. कित्येक दिवसानंतर रंगतदार सामन्यानंतरचा हा प्रसंग देशवासीयांना भावनिक करुन गेला. विशेष म्हणजे हा व्हिडीओ मराठी आहे. कारण, व्हिडीओतील एक व्यक्ती अरे.. जाऊ दे.. होऊ दे आऊट... असे म्हणताना दिसत आहे.