Major League Cricket : अमेरिकेत सुरू असलेल्या मेजर लीग क्रिकेटमध्ये टेक्सास सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स न्यू यॉर्क यांच्यातली लढत अटतटीची झाली. सुपर किंग्सच्या १५५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सला ८ बाद १३७ धावा करता आल्या. सुपर किंग्सने १७ धावांनी हा सामना जिंकला. कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिस ( ८) फलंदाजीत अपयशी ठरला असता तरी त्याने टीम डेव्हिडचा घेतलेला अविश्वसनीय झेल सामन्याला कलाटणी देणारा ठरला.
प्रथम फलंदाजी करताना डेव्हॉन कॉनवेने मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. त्याने ५५ चेंडूंत ८ चौकार व १ षटकारांसह ७४ धावा केल्या. मिचेल सँटनरने २७, डेव्हिड मिलरने १७ आणि कोडी चेट्टीने १२ धावांची मदत केली. ट्रेंट बोल्ट व कागिसो रबाडा यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात मोनाक पटेल शून्यावर बाद झाला. शयान जहांगिर आणि स्टीव्हन टेलर यांनी काहीकाळ संघर्ष केला. टेलर १५ धावांवर माघारी परतला. निकोलस पूरनही ( १९) फार काळ खेळपट्टीवर टीकला नाही. जहांगिर ४१ धावा करून माघारी परतला अन् मुंबई इंडियन्सचा संघ अडचणीत सापडला.
फॉर्मात असलेला टीम डेव्हिड ही मॅच जिंकून देईल असे वाटत असताना फॅफने अफलातून झेल घेतला. डॅनिएल सॅम्सच्या गोलंदाजीवर डेव्हिडने उत्तुंग फटका मारला अन् ३९ वर्षीय फॅफने तितक्याच चपळतेने तो झेल टिपला. इथून मुंबई इंडियन्सच्या हातून सामना निसटला. डॅनिएल सॅम्स व मोहम्मद मोहसीन यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.