AFG vs PAK : पाकिस्तान- अफगाणिस्तान यांच्यातला दुसरा वन डे सामना कमालीचा चुरशीचा झाला. पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानला ५९ धावांत गारद करून वाहवाह मिळवणाऱ्या पाकिस्तानी गोलंदाजांची कालच्या लढतीत चांगलीच धुलाई झाली. अफगाणिस्तानच्या सलामीवीरांनी विक्रमी २२७ धावांची भागीदारी केली. शाहिन, हॅरीस, नसीम या सर्वांची बोलती बंद करून अफगाणिस्तानने ३०१ धावांचे लक्ष्य ठेवले. पाकिस्ताननेही चांगला खेळ केला, परंतु अखेरच्या षटकात चांगलेच नाट्य रंगले. फझहक फारूकीने ५०व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर भारतीय गोलंदाज आर अश्विनची ट्रिक वापरली अन् पाकिस्तानची गोची झाली. पण, पाचव्या चेंडूवर चौकार खेचून त्यांनी थरारक विजय मिळवला.
३०१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना फखर जमान ( ३०) पहिल्या विकेटसाठी इमाम-उल-हकसह ५२ धावांची भागीदारी करून माघारी परतला. त्यानंतर इमाम व कर्णधार बाबर आजम चांगले खेळले. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ११८ धावा जोडल्या. बाबर ५३ आणि इमाम ९१ धावा करून माघारी परतले अन् पाकिस्तानची पडझड सुरू झाली. मोहम्मद रिझवान ( १४), उसामा मीर (० ), इफ्तिखार अहमदन ( १७) व शाहिन शाह आफ्रिदी ( ४) यांना लवकर माघारी पाठवून अफगाणिस्तानने सामन्यात पुनरागमन केले. शादाब खानने अखेरपर्यंत झुंज दिली.
शेवटच्या षटकात विजयासाठी ११ धावांची गरज असताना फारुकीने पहिल्याच चेंडूवर मंकडींग करून शादाबला ( ४८) माघारी पाठवले. फारुकीने चेंडू टाकण्यापूर्वी शादाबने क्रिज सोडली होती आणि हे अफगाणिस्तानच्या गोलंदाजाने हेरले व लगेच रन आऊट करून शादाबला बाद केले. यानंतर नसीम शाह चांगला खेळला, २ चेंडूंत ३ धावा हव्या असताना त्याने चौकार मारून पाकिस्तानला १ विकेट व १ चेंडू राखून विजय मिळवून दिला. पाकिस्तानने ३ सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली.
तत्पूर्वी, रहमनुल्लाह गुरबाज ( १५१) आणि इब्राहिम झाद्रान ( ८०) यांनी पहिल्या विकेटसाठी २२७ धावांची विक्रमी भागीदारी करून पाकिस्तानच्या गोलंदाजांना बेक्कार चोपले. गुरबाजने १४ चौकार व ३ षटकारांची आतषबाजी करून पाकिस्तानविरुद्ध वन डे क्रिकेटमध्ये सर्वोत्तम खेळी करणाऱ्या फलंदाजांमध्ये दुसरे स्थान पटकावले. या दोघांच्या व्यतिरिक्त मोहम्मद नबीने २९ व हशमतुल्लाह शाहिदीने १५* धावांची खेळी केली. अफगाणिस्तानने ५ बाद ३०० धावा केल्या.
Web Title: Video : Fazalhaq Farooqui ran out Shadab Khan at the non striker's end, but Pakistan win in a final-over thriller to take an unassailable 2-0 lead in the ODI series against Afghanistan
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.