IND vs NZ : कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने न्यूझीलंडवर वनडे मालिकेत शानदार विजय नोंदवला. इंदूरमधील शेवटची वनडे जिंकून भारतीय संघाने मालिका 3-0 ने आपल्या नावावर केली. ही मालिका टीम इंडियाचा स्टार ओपनिंग बॅट्समन शुभमन गिलसाठी (Shubhman Gill) अतिशय धमाकेदार झाली. या मालिकेत त्याने 1 द्विशतक आणि 1 शतक झळकावले. तिसऱ्या सामन्यात फलंदाजीदरम्यान एक मजेशीर घटना घडली.
न्यूझीलंडची फलंदाजी सुरू होती आणि शुभमन बॉंड्रीजवळ फिल्डिंग करत होता, यावेळी प्रेक्षकांनी साराच्या नावाने घोषणाबाजी सुरू केली. 'हमारी भाभी कैसी हो, सारा भाभी जैसी हो' असे चाहते म्हणू लागले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. मात्र, शुभमनसोबत असे घडण्याची ही पहिली वेळ नाही, याआधीही गिलला चाहत्यांनी साराच्या नावाने चिडवले आहे.
शुभमन गिलचे नाव बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) आणि माजी भारतीय क्रिकेटर सचिन तेंडुलकरची (Sachin Tendulkar) मुलगी सारा तेंडुलकरसोबत (Sara Tendulkar) जोडले जात आहे. मात्र गिलने या विषयावर कधीही त्याची बाजू मांडली नाही.
गिलने 3 सामन्यात 360 धावा केल्याशुभमन गिलने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात 208 धावांची धडाकेबाज खेळी केली. हे करत तो द्विशतक झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सामील झाला. दुसऱ्या वनडेत त्याला जास्त धावा करता आल्या नाहीत. मात्र तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात शुभमन गिलने पुन्हा एकदा न्यूझीलंडच्या गोलंदाजांना तारे दाखवत शतक झळकावले. या तीन डावांसह गिलने केवळ 3 सामन्यात 180 च्या सरासरीने 360 धावा केल्या.