Hardik Pandya Vadodara Road Show : 29 जून 2024 रोजी झालेल्या T20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करुन 17 वर्षांनी ट्रॉफीवर नाव कोरले. भारतात परतल्यानंतर खेळाडूंचे मुंबईत भव्य स्वागत करण्यात आले. विशेष म्हणजे, खेळाडू आपापल्या गावी गेल्यानंतर, तिथेही त्यांचे जंगी स्वागत झाले. अंतिम सामन्याचा स्टार हार्दिक पांड्यादेखील आज त्याच्या बडोदा(वडोदरा) शहरात परतला. यादरम्यान मरीन ड्राईव्हप्रमाणे येथेही त्याचा खुल्या बसमधून रोड शो निघाला. यावेळी त्याच्या स्वागतासाठी हजारो चाहते रस्त्यावर जमले.
हार्दिक पांड्याचा हा रोड शो मांडवी येथून सुरू होऊन लहरीपुरा, सूरसागर आणि दांडिया बाजारमार्गे नवलखी कंपाऊंड येथे संपला. त्याच्या या बसवर 'प्राइड ऑफ वडोदरा' असे लिहिले होते. आपल्या लाडक्या हार्दिकच्या स्वागतासाठी रस्त्यावर चाहत्यांनी तोबा गर्दी केली होती. अनेक चाहत्यांनी हातात तिरंगा झेंडा घेऊन देशाच्या नावे घोषणा दिल्या. यावेळी हार्दिक ओपन बसवरुन टीम इंडियाच्या जर्सीत चाहत्यांचे आभार मानताना दिसला. या रोड शोदरम्यान 'वंदे मातरम' गाणं वाजवण्यात आले.
क्रुणाल पांड्याही सामील झालाबराच वेळ फक्त हार्दिक पांड्या खुल्या बसमध्ये बसून लोकांच्या शुभेच्छा स्वीकारताना दिसत होता. काही वेळाने त्याचा भाऊ कृणाल पांड्याही बसमध्ये दिसला. क्रुणाल ब्लॅक टी शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट घालून बसवर चढला. या रोड शोची सर्वात मजेदार गोष्ट म्हणजे, टीम इंडियाच्या मुंबईतील रोड शोमध्ये ज्याप्रमाणे एक चाहता झाडावर चढला होता, त्याचप्रमाणे यावेळी देखील एक व्यक्ती झाडावर चढून हार्दिकचा फोटो काढताना दिसला.