मुंबई - अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला दोन आठवडे पूर्ण होत आहेत. पण, त्याच्या मृत्यूचे कारण अद्यापही समोर आलेले नाही. सुशांतने डिप्रेशनमुळे आत्महत्या केली, असे मानले जात आहे. तर, बॉलिवूडमधील नेपोटीझममुळेच सुशांतचा बळी गेल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. सुशांतच्या अकाली मृत्युनंतर बॉलिवूडसह क्रिकेट जगतालाही मोठा धक्का बसला आहे. त्यात, पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने सुशांतसोबतच्या भेटीची आठवण करुन दिली आहे. शोएबने एका व्हिडिओच्या माध्यमातून सुशांतच्या मृत्यूच्या बातमीने दु:ख झाल्याचे म्हटले.
अभिनेता सुशांतसिंह राजपूतने टीव्ही सिरीयलमधून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. त्यानंतर, काय पो छे या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखलवी. तर, एमएस धोनी द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटाने सुशांतला चांगलेच ग्लॅमर मिळाले. महेंद्रसिंह धोनीच्या जीवनावर आधारीत या चित्रपटानंतर त्याला मोठ्या बॅनरचे चित्रपट मिळाले. तसेच, सुशांतचे नाव घराघरात पोहोचण्यासही या चित्रपटाची मोठी मदत झाली. एम.एस. धोनी द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटामुळे सुशांतसिंहचा दिग्गज क्रिकेटर्संशीही जवळून संबंध आला. त्यामुळेच, क्रिकेट जगतातही त्याच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे. आता, पाकिस्तानचा गोलंदाज व रावळपिंडी एक्सप्रेस शोएब अख्तरने सुशांतच्या आठवणी जागवल्या आहेत.
मी 2016 साली मुंबईत असताना सुशांतसिंहला भेटलो होतो, पण आमचा संवाद झाला नाही याची मला खंत आहे. मला त्यावेळीस सुशांतमध्ये आत्मविश्वास दिसला नाही, तो माझ्याजवळून मान खाली करुन निघून गेला. मला माझ्या एका मित्राने सांगितले क, तो तरुण एमएस. धोनी हा चित्रपट करत आहे. त्यानंतर, मी मुंबई सोडली. मात्र, सुशांतचा अभिनय पाहायचं ठरवलं होतं. एक विनम्र पार्श्वभूमीतून सुशांत पुढे आला असून धोनी हा चित्रपट त्याने यशस्वी करुन दाखवला. मी त्यावेळेस त्याच्याशी बोललो नाही, याची मला आजही खंत वाटते, असे अख्तरने एका व्हिडिओत म्हटले. मी जेव्हा क्रिकेटमध्ये आलाो, तेव्हा वसिम अक्रम आणि वकार युनूस हे दिग्गज होते. त्यामुळे, मलाही प्रचंड मेहनत घ्यावी लागली. कारण, वसिम आणि वकार हे सलमान खान व शाहरुख खानसारखेच होते.
दरम्यान, अशात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी सुशांतच्या डिप्रेशनबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. दिवंगत अभिनेता सुशांतला आपण जॉर्ज फर्नांडिस यांच्या बायोपिकमध्ये घेण्याचा विचार करत होतो. पण सुशांतच्या डिप्रेशनमुळे हे शक्य झाले नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.