Join us  

Video : ICC ने पाकिस्तानला उपांत्य फेरीतून बाहेर केले! पाहा मुंबईत असे नेमके काय घडले

ICC ODI World Cup 2023 : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीचे चारही संघ निश्चित झाले आहेत, फक्त चौथ्या क्रमांकावरील संघाची औपचारिकता शिल्लक आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2023 8:30 PM

Open in App

ICC ODI World Cup 2023 : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीचे चारही संघ निश्चित झाले आहेत, फक्त चौथ्या क्रमांकावरील संघाची औपचारिकता शिल्लक आहे. न्यूझीलंडने गुरुवारी श्रीलंकेवर दणदणीत विजय मिळवून पाकिस्तान व अफगाणिस्तान यांना स्पर्धेबाहेर फेकले. अफगाणिस्तान आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटचा साखळी सामना खेळतोय आणि त्यांना उपांत्य फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी ४३४ धावांनी विजय आवश्यक होता. पण, त्यांनी प्रथम फलंदाजी करताना २४४ धावा करताच ते उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर फेकले गेले. पाकिस्तान तांत्रिकदृष्ट्या स्पर्धेत आहेत, परंतु त्यासाठीचे गणित गाठणे अवघड आहे. पण, ही औपचारिकता पार पडण्याआधीच आयसीसीने पाकिस्तानला स्पर्धेबाहेर केले आहे.

पाकिस्तानला उपांत्य फेरीत प्रवेश पक्का करण्यासाठी इंग्लंडविरुद्ध प्रथम फलंदाजी करून किमान २८८ धावांनी विजय मिळवावा लागणार आहे. उदा. जर ३०० धावा केल्यास इंग्लंडला १३ धावांवर गुंडाळावे लागेल, ३५० धावा केल्यास इंग्लंडला ६३ धावांवर गुंडाळावे लागेल आणि ४०० धावा केल्यास इंग्लंडला ११२ धावांवर गुंडाळावे लागेल. इंग्लंडने प्रथम फलंदाजी केल्यास ते जे काही लक्ष्य ठेवतील ते ३ षटकांत पार करावे लागेल. या परिस्थितीत पाकिस्तान उपांत्य फेरीत पोहोचणे अवघडच आहे.

दरम्यान, आयसीसीने आज दिवाळी निमित्त गेट वे ऑफ इंडियावर वर्ल्ड कप फिव्हरची रोषणाई केली. खास लेझर शोच्या माध्यमातून त्यांनी या वर्ल्ड कपचा प्रवास मांडला आणि त्यात त्यांनी उपांत्य फेरीत रोहित शर्माच्या सोबतीला केन विलियम्सन आणि पॅट कमिन्सच्या सोबतीला टेम्बा बवुमा यांना उभं केलं. त्यामुळे भारत-न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका या उपांत्य फेरीच्या लढतींवर आयसीसीनेच शिक्कामोर्तब केले.  

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपभारत विरुद्ध न्यूझीलंडआॅस्ट्रेलियाद. आफ्रिकाआयसीसी