ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या बिग बॅश लीगमध्ये शनिवारी धावांचा पाऊस पडला. पर्थ स्कॉर्चर्स विरुद्ध ब्रिस्बन हिट यांच्यातल्या सामन्यात चौकार षटकारांची आतषबाजी पाहायला मिळाली. प्रथम फलंदाजी करणआऱ्या स्कॉर्चर्स संघानं 3 बाद 213 धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात ब्रिस्बन हिट संघाच्या टॉम बँटननं तोडीसतोड उत्तर दिलं. बँटन हा इंडियन प्रीमिअर लीगमध्ये यंदा कोलकाता नाइट रायडर्सचे प्रतिनिधित्व करणार आहे. या सामन्यात बँटननं एक अफलातून षटकार खेचला. त्यानंतर बिग बॅश लीगला सोशल मीडियावर असा फटका मारण्याचा प्रयत्न करू नका, असे आवाहन करावं लागलं. बँटनच्या त्या षटकाराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकुळ घालत आहे.
प्रथम फलंदाजीला आलेल्या स्कॉर्चर्ससाठी मिचेल मार्शनं तुफान खेळी केली. जोश इंग्लिस ( 28) आणि लिएम लिव्हिंगस्टोन ( 39) यांनी पहिल्या विकेटसाठी 39 धावा जोडल्या. इंग्लिस बाद झाल्यानंतर लिव्हिंगस्टोन व सॅम व्हाइटमन (4) यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण, व्हाइटमन लगेच माघारी परतला. त्यापाठोपाठ लिव्हिंगस्टोनही बाद झाला. त्यानंतर कर्णधार मिचल मार्श आणि कॅमेरून बँक्रॉफ्ट यांनी दणदणीत खेळ केला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी नाबाद 124 धावांची भागीदारी केली. बँक्रॉफ्टनं 29 चेंडूंत 3 षटकारांसह नाबाद 41 धावा चोपल्या. पण, मार्शची खेळी भाव खाऊन गेली. त्यानं 41 चेंडूंत 3 चौकार व 8 षटकारांसह नाबाद 93 धावा केल्या. त्याच्या या खेळीच्या जोरावर स्कॉर्चर्स संघानं 213 धावांचा डोंगर उभा केला.
लक्ष्याचा पाठलाग करताना ब्रिस्बन हिटच्या आघाडीच्या फळीला साजेशी कामगिरी करता आली नाही. मॅक्स ब्रायंट ( 5), कर्णधार ख्रिस लीन ( 14) आणि मॅट रेनशॉ ( 1) यांना अनुक्रमे झाय रिचर्डसन, ख्रिस जॉर्डन आणि जोएल पॅरीस यांनी बाद केले. पण, सलामीवीर बँटन एका बाजूनं फटकेबाजी करत होता. 21 धावांवर असताना त्यानं यष्टिरक्षकाच्या डोक्यावरून अफलातून षटकार खेचला. बँटन 32 चेंडूंत 7 चौकार व 2 षटकारांसह 55 धावांवर माघारी परतला. फवाद अहमदनं त्याला बाद केले.