भारतात आज मोठ्या उत्साहात धुलीवंदन साजरा केला गेला. रंगांची उधळण करून एकमेकांना उत्साहात रंग लावून हा सण आज साजरा झाला. भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंनीही एकमेकांवर रंगाची उधळण करत धुलीवंद साजरा केला.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या आणि शेवटच्या कसोटीच्या तयारीदरम्यान भारतीय क्रिकेट संघाने धुलीवंदन साजरा केला. भारताचा सलामीवीर फलंदाज शुभमन गिल याने त्याच्या इंस्टाग्रामवर एक रील पोस्ट केली आणि व्हिडिओमध्ये विराट कोहली आणि भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मासह प्रत्येकजणांनी बसमध्ये रंगाची उधळण केल्याचे व्हिडिओमधून दिसून येतेय.
महिला प्रीमिअर लीगच्या धामधुमीतही खेळाडूंना धुलीवंदन खेळण्याचा मोह आवरता आला नाही. RCBच्या खेळाडूंनी धुलीवंदन साजरा केला. कर्णधार स्मृती मानधना, रिचा घोष आदी भारतीय खेळाडूंसह परदेशी खेळाडूंनीही या सणाचा आनंद लुटला. RCB ने त्यांचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेत आतापर्यंत तीन सामने खेळले गेले. या तिन्ही सामन्यांचा निकाल तीन दिवसांत लागला. अशा स्थितीत तिन्ही सामन्यांच्या खेळपट्टीवर चांगलाच गोंधळ उडाला आहे. चार सामन्यांच्या मालिकेत भारत २-१ ने पुढे आहे. अहमदाबादमध्ये ९ मार्चपासून अखेरची कसोटी खेळली जाणार आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या (WTC) अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी भारतीय संघासाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे.
पराभवामुळे टीम इंडियाचा प्लॅन बदलला
भारतीय संघाने पहिल्या दोन सामन्यात चमकदार कामगिरी करताना ऑस्ट्रेलियाला चकित केले होते. पण इंदूर कसोटी सामन्यात नॅथन लायन आणि मॅट कुहनमन यांनी रचलेल्या जाळ्यात भारतीय संघ अडकला. ऑस्ट्रेलियन फिरकीपटूंनी फिरकीचे असे जाळे विणले की भारताला दोन्ही डावात ३०० धावाही करता आल्या नाहीत.
भारतासाठी विजय खूप महत्त्वाचा-
अहमदाबाद कसोटी जिंकणे भारतीय संघासाठी खूप महत्त्वाचे असेल. जर ती हमदाबादमध्ये जिंकली तर ती WTC फायनलमध्ये पोहोचेल. ऑस्ट्रेलियन संघाचा सामना अनिर्णित राहिला किंवा विजय मिळवला तर भारतासाठी कठीण होईल. अशा स्थितीत न्यूझीलंडचा संघ श्रीलंकेविरुद्धचा किमान एक सामना ड्रॉ करेल किंवा जिंकेल अशी प्रार्थना भारताला करावी लागेल.