भारताचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाण याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये इरफान पठाणचा मुलगा भारताचा माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसोबत मस्ती करताना दिसून येत आहे. इरफान पठाणने हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
इरफान पठाणने ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये इरफान पठाणचा मुलगा इमरान आणि सचिन तेंडुलकर बॉक्सिंग करताना दिसून येत आहे. तसेच इमरान सचिनसोबत आपली उंची देखील मोजण्याचा प्रयत्न करत आहे. इरफानने या व्हिडिओसोबत एक मेसेज लिहिला की, इमरानला माहिती नाही की, त्याने काय केले आहे. पण जेव्हा तो मोठा होईल तेव्हा त्याला नक्की समजेल.इरफानच्या या व्हिडिओवर सचिनने देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे.
लहान मुलांसोबत वेळ घालवणं नेहमीच आनंददायी असतं. तसेच एक दिवस तुझे मसल्स देखील माझ्यासारखे आणि तुझे वडिल इरफान खान यांच्यासारखे होतील अशी सचिनने या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे.
रस्ता सुरक्षेसाठी रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज क्रिकेट स्पर्धेत सचिन आणि इरफान इंडिया लिजंड या संघाकडून खेळत आहे. याच दरम्यान सचिन आणि इरफानच्या मुलाची भेट झाली होती.
दरम्यान, पहिला सामना इंडिया लिजंड विरुद्ध वेस्ट इंडिज लिजंड यांच्यात शनिवारी मुंबईतील वानखेडे मैदानावर झाला. या सामन्यात विरेंद्र सेहवागच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर इंडिया लिजंड्सने विंडिजवर 7 गडी राखून विजय मिळवला. विंडिजने दिलेल्या 150 धावांचा पाठलाग करताना इंडिया लिजंड्सच्या सचिन आणि सेहवाग या सलामीच्या जोडीने 83 धावांची भागिदारी केली. त्यानंतर सेहवागने एका बाजुने फटकेबाजी करत संघाला विजय मिळवून दिला.
तत्पूर्वी नाणेफेक जिंकत भारताचा कर्णधार सचिन तेंडुलकरने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विंडीजच्या संघाने सावध सुरुवात करत भारतीय गोलंदाजांचा नेटाने सामना केला. मात्र झहीर खानने आपल्या नेहमीच्या शैलीत डॅरेन गंगाचा त्रिफळा उडवत भारताला पहिलं यश मिळवून दिलं. यानंतर कर्णधार ब्रायन लारा इरफान पठाणच्या गोलंदाजीवर समीर दिघेकरवी यष्टीचीत झाला. मात्र दुसऱ्या बाजूने शिवनारायण चंद्रपॉलने एक बाजू सांभाळून धरत विंडीज संघाला आश्वासक धावसंख्या उभारुन दिली. त्याने ४१ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांसह ६१ धावा केल्या. भारताकडून झहीर खान-मुनाफ पटेल आणि प्रज्ञान ओझा यांनी प्रत्येकी २-२ तर इरफान पठाणला एक विकेट घेण्यात यश आले.