नवी दिल्ली - वुमेन्स प्रिमियर लीग म्हणजेच डब्लूआयपीएलच्या दुसऱ्या हंगामातील अंतिम सामन्यात राजधानी दिल्ली येथे महिला आरसीबीने चॅम्पियनशीप मिळवली. टीम आरसीबीच्या या विजयाचा क्रिकेट प्रेमी सर्वांनीच आनंद व्यक्त केला. तर, आरसीबी पुरुष संघाचा कर्णधार विराट कोहलीलाही व्हिडिओ कॉलद्वारे महिला संघाशी संवाद साधत अत्यानंद व्यक्त केला. यावेळी, आरसीबी महिला संघाची कर्णधार स्मृती मानधनाने ट्रॉफी उंचावत जल्लोष केला. यावेळी, स्मृतीचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छलही मैदानावर हजर होता. त्यामुळे, तोही या आनंदात सहभागी झाल्याचे दिसून आले.
आयपीएलच्या हंगामात आरसीबीने तीनवेळा अंतिम सामन्यात धडक मारली. मात्र, कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्त्वात तिन्ही वेळेस जेतेपदाने हुलकावणी दिली. त्यामुळे, आरसीबी महिला संघाने पटकावलेलं यश आरसीबीच्या चाहत्यांना मोठा आनंद देऊन गेले. विशेष म्हणजे मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि विरेंदर सेहवासह दिग्गज खेळाडूंनी वुमेन टीम आरसीबीचं कौतुक केलंय. दरम्यान, स्मृती मानधनाच्या नेतृत्वातील संघाने ट्रॉफी उंचावली. दिल्ली कॅपिटल्सचा ८ विकेट राखून पराभव करून बंगळुरूने महिला प्रीमिअर लीगच्या दुसऱ्या हंगामाचे जेतेपद पटकावले.
विजयानंतर विराट कोहलीने व्हिडिओ कॉलद्वारे महिला संघाच्या सेलिब्रेशनमध्ये सहभाग नोंदवला. तर, स्मृतीचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छलही मैदानावर धावत आला. स्मृती आणि पलाश यांच्या गळाभेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच, दोघांनी एकत्रितपणे ट्रॉफी उंचावल्याचे फोटोही सोशल मीडियातून समोर आले आहेत. पलाशने इंस्टाग्रामवरुन इंस्टाग्रामवरुन फोटो शेअर केला असून त्यामध्ये, स्मृतीसह त्याने डब्लूपीएल चॅम्पियनचा चषक हाती घेतल्याचं दिसून येत आहे.
दरम्यान, पलाश हा इंदौरचा रहिवाशी असून तो गायक आहे. गतवर्षी २०२३ मध्ये या दोघांच्या रिलेशनशीपचे वृत्त माध्यमांत आले. पलाशने एका लाईव्ह कॉन्सर्टमध्ये गाणं गाऊन ते स्मृतीला डेडिकेट केलं होतं, तर आय लव्ह यू टू स्मृती.. असेही त्याने म्हटले होते. आता, डब्लूपीएल चॅम्पियनशीप विजयानंतर दोघांमधील प्रेमाची जादू की झप्पी सर्वांनीच पाहिली.
आरसीबीने दिल्ली कॅपिटल्सला नमवून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने ऐतिहासिक कामगिरी केली. मागील हंगामातील उपविजेता दिल्ली कॅपिटल्सला यंदा देखील उपविजेत्या पदावर समाधान मानावे लागले. मुंबई इंडियन्सला पराभूत करून फायनलचे तिकीट मिळवलेल्या आरसीबीने सांघिक खेळी केली. प्रथम गोलंदाजीत मग फलंदाजीत चमक दाखवत स्मृती मानधनाच्या नेतृत्वातील संघाने ट्रॉफी उंचावली. दिल्ली कॅपिटल्सचा ८ विकेट राखून पराभव करून बंगळुरूने महिला प्रीमिअर लीगच्या दुसऱ्या हंगामाचे जेतेपद पटकावले.