इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातला दुसरा कसोटी सामना अनिर्णीत राहिला. न्यूझीलंडच्या पहिल्या डावाच्या 375 धावांच्या उत्तरात इंग्लंडनं 476 धावा केल्या. त्यानंतर न्यूझीलंडनं दुसऱ्या डावात 2 बाद 241 धावा करताना सामना अनिर्णीत राखला. न्यूझीलंडनं दोन सामन्यांची ही मालिका 1-0 अशी जिंकली. केन विलियम्सन आणि रॉस टेलर यांनी शतकी खेळी करताना किवींचा डाव सावरला. पण, या सामन्यात असा एक प्रसंग घडला की जो पाहून इंग्लंडचा गोलंदाज जोफ्रा आर्चरनं डोक्यावर हात मारला.
न्यूझीलंडनं टॉम लॅथमच्या 105 खेळीच्या जोरावर पहिल्या डावात 375 धावा केल्या. त्याला रॉस टेलर ( 53), बीजे वॉटलिंग ( 55) आणि डेरील मिचेल ( 73) यांची उत्तम साथ लाभली. इंग्लंडची सुरुवात निराशाजनक झाली. डॉम सिब्ली आणि जो डेन्ली यांना अपयश आल्यामुळे इंग्लंडची अवस्था 2 बाद 24 अशी झाली होती. पण, रोरी बर्न्स आणि कर्णधार रूट यांनी इंग्लंडचा डाव सावरला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 173 धावांची भागीदारी केली. बर्न्स 209 चेंडूंत 15 चौकारांच्या मदतीनं 101 धावा करून माघारी परतला.
त्यानंतर पुन्हा इंग्लंडला घरघर लागली. बेन स्टोक्स ( 26) आणि झॅक क्रॅवली ( 1) यांना फार कमाल करता आली नाही. ऑली पोपनं रुटसह इंग्लंडची खिंड लढवली. पोप 202 चेंडूंत 75 ( 6 चौकार) धावा करून माघारी परतला. पण, रूट एका बाजूनं खेळपट्टीवर चिकटून होता. त्यानं 441 चेंडूंत 22 चौकार व 1 षटकार मारून 226 धावा चोपल्या. अन्य फलंदाज फार काही कमाल न करू शकल्यानं इंग्लंडचा पहिला डाव 476 धावांवर गडगडला. रुटनं या द्विशतकी खेळीसह फॉर्म मिळवला, शिवाय न्यूझीलंडमध्ये द्विशतक झळकावणाऱ्या पहिल्या परदेशी कर्णधाराचा मानही पटकावला.
दुसऱ्या डावात किवींची सुरुवात निराशाजनक झाली. टॉम लॅथम व जीन रावल हे अवघ्या 28 धावांवर माघारी परतले. पण, त्यानंतर केन व रॉस यांनी किवींचा डाव सावरला. केननं 234 चेंडूंत 11 चौकारांसह नाबाद 104, तर रॉसनं 186 चेंडूंत 11 चौकार व 2 षटकार खेचून नाबाद 105 धावा केल्या. 66 धावांवर असताना केनचा सोपा झेल इंग्लंडच्या जो डेन्लीनं सोडला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इतका सोपा झेल सोडल्यानं गोलंदाज आर्चरला हसावं की रडावं हेच समजेनासे झाले. पाहा व्हिडीओ...