ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा, सर्वाधिक षटकार, सर्वाधिक सामने, सर्वाधिक शतकं, आदी विक्रमांमुळेच वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलला युनिव्हर्स बॉस असं संबोधलं जातं. जगातला कितीही दिग्गज गोलंदाज असो गेलसमोर सर्व फेल ठरल्याचा इतिहास आहे. एकदा का गेलची बॅट तळपली की त्याच्या दाणपट्ट्यातून कोणाचीच सुटका नाही. त्यामुळेच ट्वेंटी-20 स्पेशालिस्ट फलंदाजांत गेल अव्वल स्थानी आहे. पण, भल्याभल्या गोलंदाजांची त्रेधातिरपिट उडवणाऱ्या गेलची दक्षिण आफ्रिकेच्या युवा गोलंदाजासमोर दैना झाली.
गेल सध्या आफ्रिकेत सुरू असलेल्या मॅझन्सी सुपर लीगमध्ये खेळत आहे आणि त्याच लीगमध्ये आफ्रिकेच्या ज्युनियर डालाच्या गोलंदाजीवर गेलला खेळणं अवघड गेले. गेल जोझी स्टार्स संघाचे प्रतिनिधित्व करत आहे आणि त्यांचा सामना नेल्सन मंडेला बे जायंट्सशी होता. पण, या सामन्यात गेलला साजेशी सुरुवात करता आली नाही. सामन्याच्या चौथ्या षटकातच डालानं गेलची दांडी उडवली. डालाचा यॉर्कर खेळणं गेलला जवळपास जमलेच नाही आणि तीनही स्टम्प्स उखडले. गेलनं 9 चेंडूंत 11 धावा केल्या.
प्रत्युत्तरात बे जायंट्स संघानं 9 विकेट्स राखून हे लक्ष्य सहज पार केले. जेसन रॉय आणि बेन डंक यांनी पहिल्या विकेट्साठी 52 धावांची भागीदारी केली. रॉयनं 12 चेंडूंत 31 धावा केल्या. त्यात चार चौकार व दोन षटकार खेचले. डंकनं 30 चेंडूंत चार चौकार व चार षटकार खेचत 50 धावा केल्या. कर्णधार जेजे स्मट्सनं 14 चेंडूंत 23 धावा केल्या.