म्हैसूर वॉरियर्सचा कर्णधार करुण नायरने ( Karun Nair ) महाराजा करंडक KSCA T20 2023 मधील गुलबर्गा मिस्टिक्स विरुद्ध एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या लढतीत दमदार फटकेबाजी केली. नवव्या षटकात फलंदाजीसाठी आलेल्या नायरने हंगामातील पहिले शतक झळकावले. त्याच्या शतकामुळे वॉरियर्सला मोठी धावसंख्या उभारण्यात मदत झाली आणि मिस्टिक्सचा ३६ धावांनी पराभव केला.
मिस्टिक्सचा कर्णधार विजयकुमार व्यशकने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. संथ सुरुवातीनंतर वॉरियर्सचे सलामीवीर रविकुमार समर्थ आणि एसयू कार्तिक यांनी वेग पकडला. पॉवर प्लेमध्ये वॉरियर्सने बिनबाद ४९ धावा केल्या होत्या. नवव्या षटकात अविनाश डीने २३ चेंडूत ४१ धावा करणाऱ्या कार्तिकला माघारी पाठवले. समर्थने ३६ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. नायरने आपल्या खेळीचा पहिला षटकार १५ व्या षटकात लगावला.
अविनाशच्या षटकात त्याने दोन षटकार मारले. त्याने अभिलाष शेट्टीच्या चेंडूवर षटकारासह अवघ्या २५ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. समर्थने एकाच षटकात सलग चार चौकार मारले. पुढच्याच षटकात नायरने प्रतिस्पर्धी कर्णधाराला ३ षटकार ठोकले. १८व्या षटकात नायरने मॅकनील हॅडली नोरोन्हाच्या चेंडूवर तीन षटकार आणि एक चौकार लगावला. व्यशकने टाकलेल्या अंतिम षटकात नायरला टॉप-एजद्वारे चौकार मिळाला. त्याने आपले शतक पूर्ण केले आणि आपली बॅट माईकप्रमाणे खाली टाकण्यासाठी उभी केली. मग, त्यांनी समीक्षकांना गप्प केल्यासारखे आनंदाने ओठांवर बोट ठेवले.