टीम इंडियाचा माजी फलंदाज, क्रिकेटचा देव, मास्टरब्लास्टर आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर म्हणजे तीन पिढ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवेलला क्रिकेटचा अनभिज्ञ सम्राट. भारतासह जगभरात सचिनचे चाहते आहेत, गल्लीबोळात, रस्त्यावर, दरी-डोंगरात, गावखेड्यात आणि कानाकोपऱ्यातही सचिन तेंलुडकर हे नाव नवीन नाही. कारण, क्रिकेटवेड्या देशातील क्रिकेटप्रेमींसाठी सचिन हा देव आहे. त्यामुळेच, आजही गावागावात, गल्ली क्रिकेट खेळले जाते तेव्हा सचिनच्या नावाच उल्लेख होतोच. मात्र, गल्ली क्रिकेट खेळणाऱ्यांमध्येच सचिन तेंडुलकरने येऊन बॅट हाती घेतल्यावर काय होईल.
पृथ्वीतलावावरील स्वर्ग म्हणजे आपलं जम्मू-काश्मीर. देशाच्या सीमारेषेवरील निसर्ग सौंदर्याचं वरदान लाभलेला हा प्रदेश सुंदरतेमुळे आणि दहशतवादी कारवायांमुळेही कायम चर्चेत असतो. याच जम्मू काश्मीरमध्ये सचिन तेंडुलकर सहकुटुंब फिरायला गेला होता. त्यावेळी, काश्मीरच्या रस्त्यावर क्रिकेट खेळणाऱ्या तरुणांसोबत सचिनने क्रिकेट खेळून आनंद साजरा केला.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मैदानावर जागतिक विक्रमांचे मनोरे रचणाऱ्या सचिनने काश्मीरमधील मुलांसोबत क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. सचिनने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन येथील क्रिकेट खेळतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये, चला कोण आहे तुमच्यातील गोलंदाज, असे म्हणत मुलांना चेंडू फेकण्यासाठी सांगतो. त्यानंतर, तेथील युवक सचिनसोबत क्रिकेट खेळताना अत्यानंद झाल्याचं दिसून येत आहे. सचिनने काही फटके मारल्याचंही व्हिडिओत दिसून येत आहे. तर, शेवटचा चेंडू खेळताना सचिन बॅट उलटी पकडतो आणि या चेंडूवर मला आऊट करा असेही म्हणतो. मात्र, शेवटचा चेंडूही सचिने दमदारपणे पुढे मारतो, तेव्हा एकच टाळ्यांचा कडकडाट होतो. दरम्यान, यावेळी, सचिनच्या सुरक्षेसाठी सैन्य दलातील जवानही येथील रस्त्यावर तैनात असल्याचे दिसून येते.
विशेष म्हणजे काश्मीरमधील ही मुले क्रिकेट खेळताना स्टंप म्हणून रॉकेलचं कॅण्ड आणि पुठ्ठ्याच्या बॉक्सचा वापर केल्याचंही व्हिडिओत पाहायला मिळत आहे. त्यामुळे, अगदी गल्लीस्टाईल क्रिकेट खेळून सचिनने काश्मीरच्या युवकांना आणि नेटीझन्सला मोठा आनंद दिला आहे.