Join us  

VIDEO: महेंद्रसिंग धोनीचा विजेच्या वेगाने गेलेला षटकार पाहून चाहते फिदा

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रिसिंग धोनीचं नाव घेतलं की अनेकांना आठवतात ते त्याचे गगनचुंबी षटकार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2018 12:45 PM

Open in App

सेंच्युरियन - भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रिसिंग धोनीचं नाव घेतलं की अनेकांना आठवतात ते त्याचे गगनचुंबी षटकार. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये षटकारांचा पाऊस पाडला होता. त्याचा हेलिकॉप्टर शॉट तर चाहत्यांचा फेव्हरेट शॉट आहे. पण बदलत्या वेळेनुसार धोनीने आपल्या फलंदाजीत बदल केला आणि नेहमी षटकार ठोकण्यापेक्षा मैदानात 'कूल' डोक्याने खेळू लागला. पण बुधवारी दक्षिण आफ्रिकेत त्याने लगावलेल्या एका षटकाराने चाहत्यांना पुन्हा एकदा जुन्या दिवसांची आठवण करुन दिली. महेंद्रसिंग धोनीने लगावलेला हा षटकार विजेच्या वेगाने रेषेपार गेला आणि चाहते पुन्हा एकदा धोनीच्या फलंदाजीवर फिदा झाले. 

भारतीय संघाचा आघाडीचा एकही फलंदाज मैदानात टिकू शकला नाही. यानंतर धोनीने आपल्या खांद्यावर जबाबदारी घेतली आणि मैदानात उतरला. संघ अडचणीत असताना मोक्याच्यावेळी मनिष पांडे (७९*) आणि महेंद्रसिंग धोनी (५२*) यांनी झळकावलेल्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर भारताने २० षटकात ४ बाद १८८ धावांची आव्हानात्मक मजल मारली. ज्यूनिअर डाला याने दोन महत्त्वपूर्ण बळी मिळवत भारतीय फलंदाजीला हादरे दिल्यानंतर मनिष - धोनी यांनी ९८ धावांची नाबाद भागीदारी केली.

दोघांनी सुरुवातीला सांभाळून फलंदाजी केली. मात्र नंतर डेथ ओव्हर्समध्ये त्यांनी गोलंदाजांवर हल्ला चढवला. 14 व्या ओव्हरमध्ये धोनीने पुढे येत एक जबरदस्त षटकार ठोकला. धोनीचा षटकार ठोकतानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

 

मात्र या सामन्यात भारताचा पराभव झाला. हेन्रिक क्लासेन (६९) आणि कर्णधार जेपी ड्युमिनी (६४*) यांनी झळकावलेल्या तडाखेबंद अर्धशतकाच्या जोरावर यजमान दक्षिण आफ्रिकेने दुस-या टी२० सामन्यात भारताचा ६ गड्यांनी पराभव केला. यासह द. आफ्रिकेने तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली असून शनिवारी रंगणार अखेरचा सामना दोन्ही संघांसाठी निर्णायक असेल. 

भारताने दिलेल्या १८९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना द. आफ्रिकेने ४ फलंदाजांच्या मोबदल्यात ८ चेंडू राखून १८९ धावा काढल्या. अडखळती सुरुवात झाल्यानंतर यजमान पुन्हा एकदा पराभवाच्या छायेत आले होते. परंतु, क्ल्सासेन - ड्युमिनी यांनी तिसºया गड्यासाठी ९३ धावांची निर्णायक भागीदारी करुन संघाच्या विजयाचा पाया रचला. क्लासेनने ३० चेंडूत ३ चौकार व ७ षटकारांची आतषबाजी करत सामना यजमानांच्या बाजूने झुकविला. जयदेव उनाडकट याने क्लासेनला बाद करुन ही जोडी फोडली. यानंतर लगेच धोकादायक डेव्हिड मिल्लरही (५) हार्दिक पांड्याचा शिकार ठरला. यावेळी भारत वर्चस्व राखणार असेच चित्र होते. 

परंतु, एका बाजूने टिकलेल्या ड्युमिनीने फरहान बेहरादीनसह दमदार फटकेबाजी करत संघाच्या विजयावर शिक्का मारला. त्याने उनाडकट टाकत असलेल्या १९व्या षटकात सलग दोन षटकार मारुन संघाला विजयी केले. ड्युमिनीने ४० चेंडूत ४ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ६४ धावांची विजयी खेळी केली. बेहरादीननेही १० चेंडूत नाबाद १६ धावांची उपयक्त खेळी केली. उनाडकटने २, तर शार्दुल ठाकूर आणि हार्दिक पांड्या यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. 

टॅग्स :महेंद्रसिंह धोनीभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका २०१८