सिडनी : ट्वेंटी-20 क्रिकेट म्हटलं की वेस्ट इंडिजचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस गेल याचे नाव आघाडीवर आलेच पाहिजे. ट्वेंटी-20 क्रिकेटमधील बरेच विक्रम गेलच्या नावावर आहेत आणि हे विक्रम मोडणे अशक्यच म्हणावं लागेल. पण, सोमवारी ऑस्ट्रेलियाच्या मिचेल क्लिंगरने गुरुवारी धमाकेदार खेळी करताना गेलनंतर ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं झळकावण्याचा विक्रम नावावर केला. व्हिटॅलिटी ब्लास्ट ट्वेंटी-20 लीगमधील ग्लोसेस्टरशायर संघाचे प्रतिनिधित्व करताना क्लिंगरने तुफानी खेळी करत केंट संघाविरुद्ध विजय मिळवून दिला.
प्रथम फलंदाजी करताना ग्लोसेस्टरशायर संघाने 3 बाद 180 धावा केल्या. त्यात कर्णधार क्लिंगरने 65 चेंडूंत 9 चौकार व 4 षटकार खेचून नाबाद 102 धावांचे योगदान दिले. त्याला मिलेस हॅमोंड ( 25) आणि जॅक टेलर ( 26*) यांची साथ लाभली. 180 धावांचा पाठलाग करताना केंट संघाकडून फॅफ ड्यू प्लेसिस ( 60) आणि सॅम बिलिंग ( 55) यांनी अर्धशतकी खेळी केली. मात्र, या दोघांची शतकी भागीदारी व्यर्थ ठरली आणि केंटला पाच धावांनी पराभव पत्करावा लागला. या विजयासह ग्लोसेस्टरशायर संघाने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
क्लिंगरचे हे ट्वेंटी-20 क्रिकेटमधील आठवे शतक ठरले. या कामगिरीसह त्याने डेव्हिड वॉर्नर व अॅरोन फिंच यांच्या प्रत्येकी 7 शतकांचा विक्रम मोडला. ऑस्ट्रेलियाकडून ट्वेंटी-20 त सर्वाधिक शतक करण्याचा विक्रम आता क्लिंगरने नावावर केला आहे. यासह त्याने ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक झळकावणाऱ्या फलंदाजांमध्ये दुसरे स्थान पटकावले. या विक्रमात गेल 21 शतकांसह आघाडीवर आहे.
पाहा व्हिडीओ...