National Sports Awards (Marathi News) : राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांचे आज राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी याला यंदाचा अर्जुन पुरस्कार देण्यात आले. भारतीय संघातील प्रमुख गोलंदाजांपैकी एक असलेल्या शमीचा इथवरचा प्रवास हा अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. संघर्षातून इथवर पोहोचलेल्या मोहम्मद शमीला हा पुरस्कार स्वीकारताना पाहिल्यावर त्याच्या आईचेही डोळे पाणावले होते.
कौटुंबिक कलह, वाद यामुळे त्रस्त झालेल्या शमीने तीनवेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता, ज्याचा खुलासा खुद्द शमीने केला होता. खरं तर शमीला त्याची पत्नी हसीन जहॉंमुळे विविध समस्यांचा सामना करावा लागला. पत्नीसोबतच्या वादामुळे तो मानसिक तणावात होता. याच कारणामुळे भारतीय खेळाडूच्या मनात टोकाचे पाऊल उचलण्याचा विचार आला होता.
वयाच्या १७व्या वर्षी मोहम्मद शमीने १९ वर्षाखालील संघासाठी ट्रायल दिली होती. पण तेव्हा त्याची निवड झाली नव्हती. यानंतर शमीचे प्रशिक्षक बदरूद्दीन यांना कोलकातावरून एक फोन आला अन् तिथूनच त्याचा प्रवास सुरू झाला. २०२३च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत शमीला पहिल्या चार सामन्यांमध्ये संधी मिळाली नव्हती. पण हार्दिकच्या दुखापतीने शमीचा प्लेइंग इलेव्हनमधील मार्ग मोकळा झाला. त्यानंतर शमी हा त्या स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला.
हा पुरस्कार स्वीकारल्यानतंर शमी म्हणाला की, ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी उपलब्धी आहे. मला हा खेळ खूप आवडतो आणि त्यात यशस्वी होण्यासाठी खूप मेहनत घेतो. माझे स्वप्न साकार करण्यासाठी माझ्या कुटुंबाने मला खूप पाठिंबा दिला आहे आणि यासाठी मी त्यांचे खूप आभार मानू इच्छितो. अमरोहा ते भारतीय क्रिकेट असा माझा प्रवास कसा झाला हे माझ्याकडे शब्द नाहीत. मी माझ्या देशासाठी नेहमीच चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करतो.