सेंच्युरियन : तीन सामन्याच्या मालिकेतील दुसऱ्या टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं भारताचा सहा गड्यांनी पराभव केला. भारतानं दिलेल 189 धावांचं आव्हान यजमानांनी हेन्रिक क्लासेन (69) आणि कर्णधार जेपी ड्युमिनी (64*) यांनी झळकावलेल्या तडाखेबंद अर्धशतकाच्या जोरावर सहज पार केलं. यासह द. आफ्रिकेने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे.
भारतानं प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांत चार बाद 188 धावांचा डोंगर उभा केला होता. संघ अडचणीत असताना मोक्याच्यावेळी मनिष पांड्ये (79*) आणि महेंद्रसिंग धोनी (52*) यांनी झळकावलेल्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर भारताने 188 धावांची आव्हानात्मक मजल मारली. ज्यूनिअर डाला याने दोन महत्त्वपूर्ण बळी मिळवत भारतीय फलंदाजीला हादरे दिल्यानंतर मनिष - धोनी यांनी पाचव्या गड्यासाठी 98 धावांची नाबाद भागीदारी केली.
धोनी-पांड्येची जोडी झक्कास जमली होती पण शेवटच्या षटकांमध्ये कॅप्टन कूल म्हणून ओळखला जाणारा धोनी मनीष पांड्येवर चांगलाच भडकला होता. धोनीच्या तोंडातून अक्षेपार्ह शब्द निघाल्याचे दिसत आहे. माजी कर्णधार धोनीचा हा व्हीडिओ सध्या सोशल माडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये कूल धोनी पांड्येवर भडकलेला दिसत आहे.
दरम्यान, भारताचा डाव ११व्या षटकात ४ बाद ९० धावा असा घसरला होता. परंतु, मनिष - धोनी यांनी सावध सुरुवातीनंतर चौफेर फटकेबाजी करत यजमानांची धुलाई करुन भारताला आव्हानात्मक मजल मारुन दिली. मनिषने 48 चेंडूत 6 चौकार व 3 षटकारांसह नाबाद 79, तर धोनीने 28 चेंडूत 4 चौकार व 3 षटकारांसह नाबाद 52 धावांचा तडाखा दिला. तर प्रत्युत्तर भारताने दिलेल्या 189 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना द. आफ्रिकेने 4 फलंदाजांच्या मोबदल्यात 8चेंडू राखून 189 धावा काढल्या. अडखळती सुरुवात झाल्यानंतर यजमान पुन्हा एकदा पराभवाच्या छायेत आले होते. परंतु, क्ल्सासेन - ड्युमिनी यांनी तिस-या गड्यासाठी 93 धावांची निर्णायक भागीदारी करुन संघाच्या विजयाचा पाया रचला. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात शनिवारी रंगणारा अखेरचा सामना दोन्ही संघांसाठी निर्णायक असेल.
धोनीने रचला नवा विक्रम -
दुसऱ्या वन-डेत धोनीनं 28 चेंडूत 52 धावा करताना ३ षटकार खेचले. त्यामुळे त्याचे आंतराष्ट्रीय टी -20मध्ये 46 षटकार झाले आहेत. या षटकारांबरोबरच तो यष्टीरक्षक म्हणून सर्वाधिक षटकार मारणारा तिसरा यष्टीरक्षक बनला आहे. त्याने ही कामगिरी करताना इंग्लंडच्या जॉस बटलरचा 43 षटकारांचा विक्रम मागे टाकला. यष्टीरक्षक म्हणून आंतराष्ट्रीय टी २० मध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या यादीत अफगाणिस्तानचा मोहम्मद शहजाद 68 षटकारांसह अव्वल स्थानी असून त्याच्या पाठोपाठ न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्युलम 58 षटकारांसह दुसऱ्या स्थानी आहे.