बांगलादेश क्रिकेट संघानं ढाका येथे झालेल्या एकमेव कसोटी सामन्यात झिम्बाब्वेवर एक डाव व 106 धावांनी विजय मिळवला. झिम्बाब्वेच्या 265 धावांच्या प्रत्युत्तरात बांगलादेशनं पहिला डाव 6 बाद 560 धावांवर घोषित केला. झिम्बाब्वेचा दुसरा डाव 189 धावांत गुंडाळून बांगलादेशनं ही कसोटी जिंकली. या सामन्यात मुश्फीकर रहिमनं नाबाद 203 धावांची खेळी करताना संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. पण, त्याची एक कृती सर्वांच्या चर्चेचा विषय ठरली आहे. स्वतःला बाद होण्यापासून वाचवण्यासाठी त्यानं जे केलं, ते सोशल मीडियावर वाऱ्यासारखं व्हायरल झालं आहे. आतापर्यंत कदाचितच असं कोणी केलं असेल...
प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेनं कर्णधार क्रेग एर्व्हिनच्या 107 धावा आणि प्रिन्स मास्व्हारेच्या ( 64) अर्धशतकाच्या जोरावर कसाबसा 265 धावांचा पल्ला गाठला. बांगलादेशच्या अबू जायेद आणि नयीम हसन यांनी प्रत्येकी चार विकेट्स घेतल्या. तैजूल इस्लामने दोन बळी टिपले. बांगलादेशनं पहिल्या डावात मोठी आघाडी घेतली. मुश्फीकरनं 318 चेंडूंत 28 चौकारांच्या मदतीनं नाबाद 203 धावा केल्या. कर्णधार मोमिनूल हकनेही 132 धावांची खेळी केली. नज्मुल होसैन ( 71) आणि लिटन दास ( 53) यांनीही अर्धशतक झळकावले. बांगलादेशनं पहिला डाव 6 बाद 560 धावांवर घोषित करून 295 धावांची आघाडी घेतली.
नाबाद द्विशतकी खेळी दरम्यान मुश्फीकर रहिमनं स्वतःला बाद होण्यापासून वाचवण्यासाठी भन्नाट शक्कल लढवली. त्यानं यष्टिंकडे जाणारा चेंडू अडवण्यासाठी यष्टिंभवती उभा राहिला.
पाहा व्हिडीओ...