न्यूझीलंडलमध्ये सुरु असलेल्या सुपर स्मॅश ट्वेंटी-20 लीगमध्ये रविवारी विक्रमी फटकेबाजी पाहायला मिळाली. नाईट संघाच्या 7 बाद 219 धावांच्या अशक्य वाटणाऱ्या लक्ष्याचा कँटेरबरी किंग्स संघानं यशस्वी पाठलाग केला. 7 विकेट् आणि 7 चेंडू राखून किंग्स संघानं हा सामना जिंकला. या सामन्यात न्यूझीलंडच्या लीओ कार्टरची खेळी अविस्मरणीय राहिली. त्यानं एका षटकात सहा उत्तुंग षटकार खेचून क्रिकेट इतिहासात आपले नाव नोंदवले.
धावांचा पाठलाग करताना कार्टरने 16व्या षटकात फिरकीपटू डेव्हसिचच्या गोलंदाजीवर ही फटकेबाजी केली. त्यानं एका षटकात सरा षटकार खेचून 36 धावा जोडल्या. कार्टरनं 29 चेंडूंत एकूण 7 षटकार व 3 चौकार खेचून नाबाद 70 धावांची खेळी केली. त्याच्या या फटकेबाजीच्या जोरावर किंग्सनं 18.5 षटकांत 3 बाद 222 धावा करून विजय मिळवला. त्याला सीजे बोवेस ( 57) आणि सीई मॅककोंचिइ ( 49*) यांनी दमदार साथ दिली. नाईटकडून टी सेईफर्ट ( 74) आणि सीजे ब्रॉवनली ( 55) यांनी फटकेबाजी केली.
पाहा व्हिडीओ
यापूर्वी गॅरी सोबर्स ( वेस्ट इंडिज), रवी शास्त्री ( भारत), हर्षल गिब्स ( दक्षिण आफ्रिका), युवराज सिंग ( भारत), रॉस व्हाइटली ( इंग्लंड ) आणि हझरतुल्लाह जझाई ( अफगाणिस्तान) या पुरुष क्रिकेटपटूंनी एका षटकात सहा षटकार खेचण्याचा पराक्रम केला आहे. कार्टर याच्यासह युवराज, व्हाइटली आणि जझाई यांनी ट्वेंटी-20त ही फटकेबाजी केली.