नवी दिल्ली : सध्या ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (AUS vs ENG) यांच्यामध्ये टी-20 मालिकेचा थरार रंगला आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंच एक लज्जास्पद कृत्य करताना कॅमेऱ्यात कैद झाला होता. खरं तर या सामन्यादरम्यान फिंचने अंपायरसमोर अपशब्द वापरले होते, ज्याचा व्हिडीओ आता समोर आला आहे. या घटनेमुळे फिंचला आयसीसीने देखील फटकारले असून त्याला डिमेरिट पॉइंटही देण्यात आला आहे.
दरम्यान, आयसीसीने आपल्या वेबसाईटच्या माध्यमातून या घटनेची माहिती दिली आहे. आरोन फिंचने आयसीसीच्या कलम 2.3 चे उल्लंघन केले आहे, मात्र मागील 24 महिन्यांतील ऑस्ट्रेलियन कर्णधाराची ही पहिली चूक आहे ज्यामुळे त्याला निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही. फिंचने आपली चूक मान्य केली आहे.
स्टंम्पच्या माईकमध्ये आवाज झाला कैद या घटनेदरम्यान फिंच रिव्ह्यू घेण्यासाठीचा 15 सेकंदांचा वेळ संपल्यानंतर अंपायरशी वाद घालताना दिसला. कर्णधार आणि अंपायर यांच्यात थोडा वेळ वादावादी देखील झाली, त्यानंतर फिंचने मैदानावर परतत असताना अंपायरसमोर शिवीगाळ केली. यादरम्यान त्याचा आवाज स्टंप माइकमध्ये कैद झाला.
इंग्लंडने जिंकला सामना टी-20 मालिकेतील पहिला सामना इंग्लिश संघाने 8 धावांनी जिंकला. या सामन्यात चौकार आणि षटकारांचा पाऊस पाहायला मिळाला होता. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 208 धावा केल्या, ज्यामध्ये ॲलेक्स हेल्स (84) आणि जोस बटलर (68) यांच्या खेळीचा समावेश होता. ऑस्ट्रेलियाकडून डेव्हिड वॉर्नरने 73 धावांची शानदार खेळी केली, मात्र त्याच्या व्यतिरिक्त कोणत्याच कांगारूच्या फलंदाजाला साजेशी खेळी करता आली नाही. अखेर इंग्लिश संघाने विजय मिळवून मालिकेत विजयी सलामी दिली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"