न्यूझीलंडमध्ये सध्या Women's Cricket World Cup 2022 खेळला जात आहे. या स्पर्धेत रविवारी (१३ मार्च) ऑस्ट्रेलिया आणि यजमान न्यूझीलंड हे दोन संघ आमनेसामने आले. हा सामना ऑस्ट्रेलियन संघाने जिंकला. एलिस पेरी आणि ताहलिया मॅकग्रा यांनी शानदार अर्धशतके झळकावली. या संपूर्ण सामन्यात एका कॅचने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. हा शानदार झेल न्यूझीलंडची खेळाडू मॅडी ग्रीनने टिपला. सुपरवुमनप्रमाणे हवेत उडी मारत तिने अप्रतिम झेल घेतला आणि चाहत्यांना अक्षरश: आश्चर्यचकित केलं. त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. पाहा व्हिडीओ-
ऑस्ट्रेलियाच्या डावात ४५व्या षटकात ही घटना घडली. ताहुहू हे षटक टाकत होती. या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर एलिस पेरीने लाँग ऑनच्या दिशेने हवेत शॉट खेळला. तिथे सीमारेषेवर असलेल्या मॅडीने धावत चेंडूचा वेध घेतला आणि शेवटच्या क्षणी सुपरवुमनसारखा डाईव्ह करत दोन्ही हातात झेल घेतला. कॅच घेताना मॅडी पूर्णपणे हवेत होती.
हा झेल खूपच महत्त्वाचा होता. कारण त्यावेळी एलिस पेरी ८६ चेंडूत ६८ धावांवर खेळत होती. त्याचवेळी सामन्याचे शेवटचे षटकही सुरू झाले होतं. अशा स्थितीत एलिसने आक्रमक खेळ करण्यास सुरुवात केली होती. पण योग्य वेळी एलिस बाद झाली.