कँडी : सध्या आशिया चषकाचा थरार रंगला आहे. श्रीलंकेतील कँडी येथे आज भारत आणि नेपाळ यांच्यात सामना होत आहे. आशिया चषकात रंगत आणण्यासाठी माजी भारतीय खेळाडू समालोचनासाठी श्रीलंकेत आहेत. टीम इंडियाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर देखील क्रिकेट तज्ञ म्हणून तिथे उपस्थित आहे. अशातच गंभीरला काही उत्साही चाहत्यांचा सामना करावा लागला. गंभीर मैदानातून समालोचन कक्षाकडे जात असताना चाहत्यांनी कोहली-कोहलीचे नारे दिले.
दरम्यान, गंभीरला पाहताच प्रेक्षकांनी कोहली-कोहलीचा जयघोष सुरू केला. सुरुवातीला गंभीर बघतच राहिला पण नंतर प्रेक्षकांकडे बोट दाखवत तो पुढे गेला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गंभीरने केलेल्या कृत्यावरून चाहते संतप्त प्रतिक्रिया देत आहेत.
पाहा व्हिडीओ
खरं तर विराट कोहली आणि गौतम गंभीर आयपीएल २०२३ मध्ये आमनेसामने आले होते. गंभीर हा आयपीएलमध्ये लखनौ सुपर जायंट्सच्या संघाचा मार्गदर्शक आहे आणि विराट कोहली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाचा भाग आहे. सामन्यात लखनौच्या फलंदाजीदरम्यान नवीन-उल-हक आणि कोहली यांच्यात बाचाबाची झाली. मग सामना संपल्यानंतर प्रकरण वाढले अन् कोहली-गंभीर भिडले. यापूर्वी देखील चाहत्यांनी गंभीरसमोर कोहली-कोहलीचा जयघोष केला होता.
यंदाच्या आयपीएलमधील वादानंतर या दोघांमधील भांडण वाढले. सोशल मीडियावर दोघांचे चाहते एकमेकांना ट्रोल करत आहेत. गंभीर सातत्याने कोहलीबद्दल भाष्य करत असतो. विराट पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात अपयशी ठरला आणि त्याला केवळ चार धावा करता आल्या. यानंतर गंभीरने स्टार स्पोर्ट्सवर बोलताना कोहलीवर टीका केली आणि त्याच्या शॉट्सच्या निवडीवर प्रश्न उपस्थित केले.