Jasprit Bumrah, IND vs AUS Video: भारताचा यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे आशिया चषक स्पर्धेतून बाहेर होता. मोहालीत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यातही तो खेळला नव्हता. पण, नागपुरात दुसऱ्या सामन्यात मात्र त्याला संधी मिळाली. त्या संधीचं सोनं करत त्याने ऑस्ट्रेलियन कर्णधार आरोन फिंचला चारीमुंड्या चीत करून टाकले. त्याने दमदार फलंदाज असलेल्या फिंचला मोठी खेळी करण्यापासून वेळीच रोखले आणि भारताच्या विजयातील मोठा अडसर दूर केला. दुखापतीनंतर पुनरागमन करताना बुमराहने अचूक यॉर्करचा भेदक मारा करत फिंचची दांडी गुल केली.
बुमराह ज्या यॉर्करसाठी ओळखला जातो, तसाच एक यॉर्कर बुमराहने दुसऱ्या टी२० सामन्यात टाकला आणि डोळ्याची पापणी लवण्याच्या आत ऑस्ट्रेलियन कर्णधार क्लीन बोल्ड झाला. ऑस्ट्रेलियन कर्णधारदेखील तो चेंडू न खेळता आल्याने थक्क झाला. बुमराह फिंचचा जेव्हा बळी घेतला तेव्हा त्याने १५ चेंडूत ४ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ३१ धावा केल्या होत्या. फिंचला वेळीच बाद करणे आवश्यक होते. कारण त्याच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलिया मोठी धावसंख्या उभारू शकते याची साऱ्यांनाच कल्पना होती. एका बाजूने ऑस्ट्रेलियन फलंदाज बाद होते, पण दुसरीकडे फिंच खिंड लढवत होता. त्यामुळे जोपर्यंत फिंच क्रीजवर होता, तोपर्यंत धोका टळला नव्हता.
कर्णधार रोहित शर्माने हा धोका ओळखला आणि संघातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाज बुमराहला चेंडू दिला. जसप्रीत बुमराहने कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवला. ऑस्ट्रेलियन डावात ५ व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर बुमराहने त्याच्या अचूक यॉर्करने फिंचला बाद केले. हा यॉर्कर इतका अप्रतिम होता की फिंचला त्याचा अंदाजही आला नाही.
८ षटकांच्या सामन्यात बुमराहने २ षटके टाकली. नागपुरात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी२० सामन्याला पावसाचा फटका बसला. हा सामना ८-८ षटकांचा खेळला गेला. त्यात बुमराहने आरोन फिंचची एकमेव विकेट घेतली आणि २३ धावा दिल्या.