Virat Kohli Fan bows, Asia Cup 2022 IND vs AFG Viral Video: आशिया चषकातून आधीच बाहेर पडलेल्या दोन संघांच्या झुंजीमध्ये आज भारताने अफगाणिस्तानवर १०१ धावांनी बाजी मारली. सामन्यात चाहत्यांना अनेक दिवसांपासून प्रतिक्षा असलेल्या विराट कोहलीच्या शतकाने वेगळीच मजा आणली. विराटच्या तुफानी खेळीच्या जोरावर भारताने २० षटकात २१२ धावांची मजल मारली. या आव्हानाचा पाठलाग करताना भुवनेश्वर कुमारच्या ५ बळींच्या जोरावर भारताने अफगाणिस्तानला २० षटकात ८ बाद १११ धावांवर रोखले. सामन्याचे प्रमुख आकर्षण ठरलेल्या विराट कोहलीच्या शतकानंतरचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून, त्यात एक वृद्ध चाहता विराटसमोर नतमस्तक होताना दिसतोय.
रोहितच्या अनुपस्थितीत कर्णधार लोकेश राहुलसोबत सलामीला आलेल्या विराटने पहिल्यापासूनच दमदार खेळी केली. सुरूवातीचा काही काळ संयमी खेळी करत त्याने अर्धशतक गाठले. पण त्यानंतर त्याची एक्स्प्रेस सुसाट सुटली. अफगाणिस्तानच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत त्याने अफलातून फटकेबाजी केली. विराटने १२ चौकार आणि ६ षटकार खेचत १२२ धावांची नाबाद खेळी केली. या खेळी दरम्यान, त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ७१वे तर टी२० क्रिकेटमधील पहिले शतक झळकावले. विराटच्या या शतकाची भारतासह जगभरातील क्रिकेट फॅन्सना प्रतिक्षा होती. विराटने आज खेळलेली खेळी डोळ्याचे पारणे फेडणारी होती. त्यामुळेच स्टेडियममध्ये असलेले आजोबा विराटपुढे थेट नतमस्तक झाल्याचे पाहायला मिळाले.
पाहा विराटसमोर नतमस्तक झाले आजोबा-
--
--
--
दरम्यान, भारताच्या डावात लोकेश राहुल-विराट कोहली जोडीने शतकी सलामी ठोकली. दोघांनीही अर्धशतके पूर्ण केल्यानंतर लोकेश राहुल ४२ चेंडूत ६१ धावा करून बाद झाला. सूर्यकुमार यादवही ६ धावांत बाद झाला. पण विराट कोहलीने नाबाद १२२ धावा कुटल्या. तर रिषभ पंतही ३ चौकारांसह २० धावांवर नाबाद राहिला. २१३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना, 'स्विंगचा किंग' भुवनेश्वर कुमारने अफगाणिस्तानचे कंबरडे मोडले. भुवीने ४ षटकांच्या स्पेलमध्ये केवळ ४ धावा दिल्या आणि ५ महत्त्वाचे फलंदाज गळाला लावले. इतर गोलंदाजांनीही त्याला झकास साथ दिली. अर्शदीपने मोहम्मद नबीला (७), आर अश्विनने मुजीब उर रहमानला (१८) तर दीपक हुडाने राशिद खानला (१५) तंबूत धाडत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. भारताने विजयासह स्पर्धेचा शेवट गोड केला.