नवी दिल्ली : पाकिस्तानचा स्टार सलामीवीर फलंदाज मोहम्मद रिझवान सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे. आशिया चषकात त्याने केलेल्या चमकदार कामगिरीमुळे तो चर्चेत आला होता. मात्र आता रिझवान पाकिस्तानच्याराष्ट्रध्वजाचा अपमान केल्यामुळे चर्चेचा विषय बनला आहे. रिझवानने पाकिस्तानचा झेंडा पायाने उचलल्याचा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. ही घटना कराची येथे झालेल्या पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यामधील चौथ्या टी-20 सामन्यानंतरची आहे. व्हिडीओ व्हायरल होताच पाकिस्तानी जनता त्याच्यावर निशाणा साधत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये मोहम्मद रिझवान आपल्या चाहत्यांना ऑटोग्राफ देत असल्याचे पाहायला मिळत आहे. यादरम्यान एक चाहता त्याला पाकिस्तानचा झेंडा देतो, रिझवान त्या झेंड्यावर ऑटोग्राफ करतो. यानंतर त्याला अनेक चाहत्यांकडून ऑटोग्राफसाठी टोपी, टी-शर्ट आणि इतर गोष्टी मिळतात. रिझवान प्रत्येकाला एक-एक करून ऑटोग्राफ देतो. व्हिडीओच्या शेवटी पाकिस्तानच्या ध्वजाचा काही भाग जमिनीवर पडल्याचे दिसत आहे. जमिनीवरील झेंड्याचा भाग रिझवान पायाने उचलत असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, रिझवानची ही व्हिडीओ व्हायरल होताच त्याच्यावर टीका होत आहे. मात्र हे सर्व काही रिझवानने जाणुनबुजुन केले नसल्याचे स्पष्ट दिसत आहे.
स्ट्राईक रेटमुळेही झाला होता ट्रोलटी-20 मधील सर्वोत्कृष्ट फलंदाज मोहम्मद रिझवान सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे. मात्र तरीदेखील त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोलर्सचा सामना करावा लागत आहे. रिजवान फलंदाजी करताना अतिशय धीम्या गतीने धावा करतो आणि त्यामुळे संघावर दबाव वाढतो, असे पाकिस्तानच्या क्रिकेट तज्ज्ञांचे मत आहे. आशिया चषकादरम्यान देखील असेच घडले होते. पाकिस्तानचा दिग्गज गोलंदाज शोएब अख्तरनेही रिझवानच्या या कमजोरीवर भाष्य केले होते.