नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-20 विश्वचषकाचा थरार रंगला आहे. सध्या स्पर्धेतील सराव सामने खेळवले जात आहेत. आज भारताचा सराव सामना यजमान ऑस्ट्रेलियाविरूद्ध पार पडला, ज्यामध्ये भारतीय संघाने 6 धावांनी विजय मिळवला. तर पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात सराव सामना खेळवला गेला, ज्यात पाकिस्तानी संघाला पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यासाठी पाकिस्तानच्या संघाचा नियमित कर्णधार बाबर आझमला विश्रांती देण्यात आली होती त्यामुळे आजच्या सामन्यात संघाचे नेतृत्व शादाब खान करत होता. अशातच पाकिस्तानी संघाचा नियमित कर्णधार बाबर आझमने भारतीय दिग्गज सुनिल गावस्कर यांची भेट घेतली आहे, ज्याचा व्हिडीओ पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) शेअर केला आहे.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच बाबर आझमचा वाढदिवस साजरा करण्यात आला. गावस्करांनी देखील बाबरला भेटून त्याच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. लक्षणीय बाब म्हणजे गावस्करांनी बाबरला वाढदिवसाची भेट म्हणून त्यांनी सही केलेली खास कॅप दिली आहे. तसेच गावस्करांनी पाकिस्तानी कर्णधाराला क्रिकेटचे धडेही दिले. बाबर आणि गावस्कर यांच्यातील संवाद पीसीबीने शेअर केला आहे.
सर्वप्रथम बाबरला भेटताच गावस्करांनी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. गावस्करांनी बाबर आझमला क्रिकेटचे धडे देताना म्हटले, "तुझी शॉर्ट सिलेक्शन चांगली असेल तर कोणतीच अडचण येणार नाही. परिस्थितीनुसार शॉर्ट सिलेक्शन कर." याशिवाय गावस्करांनी बाबरला त्यांनी सही केलेली कॅप देऊन त्याचे कौतुक केले.
आगामी सराव सामने खालीलप्रमाणे
19 ऑक्टोंबर -अफगाणिस्तान विरूद्ध पाकिस्तान बागंलादेश विरूद्ध दक्षिण आफ्रिका भारत विरूद्ध न्यूझीलंड
रविवारी भारत-पाकिस्तान आमनेसामने टी-20 विश्वचषकाच्या स्पर्धेत कट्टर प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तान 23 ऑक्टोबर रोजी आमनेसामने असणार आहेत. भारतीय संघाने पहिला सराव सामना जिंकून विजयी सलामी दिली आहे. तर पाकिस्तानच्या संघाला आपल्या सलामीच्या सामन्यात इंग्लिश संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे. खरं तर मागील विश्वचषकात पाकिस्तानने भारताचा 10 गडी राखून पराभव केला होता. त्यामुळे रविवारी होणाऱ्या सामन्यातून भारतीय संघ पराभवाचा वचपा काढणार का हे पाहण्याजोगे असेल.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"