कसोटी क्रिकेटनंतर ६० षटकांचं क्रिकेट आलं.... त्याचे ५०-५० षटकांच्या क्रिकेटमध्ये रुपांतर झालं... आता तर ट्वेंटी-२० क्रिकेटचा जमाना आहे आणि त्यात टी १० हळुहळू ट्रेंड होतंय. काळानुसार क्रिकेट बदललं.. नियम बदलले अन् हा खेळ आता केवळ मनोरंजनाचा खेळ राहिला आहे. त्यामुळेच या बदलात टिकायचं असेल तर फलंदाज व गोलंदाजही बऱ्याच युक्त्या लढवताना दिसतात... त्यात झटपट क्रिकेटमुळे गोलंदाजांचं मरण झालंय, तर फलंदाजांना सुगीचे दिवस आलेत... त्यामुळेच त्यांच्याकडून विविध फटक्यांचा शोध लावला जात आहे. पण, सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे आणि त्यातील 'सुपला' शॉट पाहून सारेच अवाक् झाले आहेत...
क्रिकेटमध्ये आतापर्यंत तुम्ही स्कूप, पूल, हुक, कव्हर ड्राईव्ह, स्ट्रेट ड्राईव्ह, अपर कट, लेट कट असे अनेक फटके पाहिले असतील... एबी डिव्हिलियर्स अन् आता सूर्यकुमार यादव यांनी तर ३६० डिग्री फटकेबाजीचा आस्वाद जगाला दिला आहे. त्यामुळे आता या पलिकडे कोणता नवीन फटका पाहायला मिळेल, याची सर्वांना उत्सुकता आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तर सध्या आहेत तेच फटके मारण्याचा फलंदाजांचा प्रयत्न दिसतोय आणि आगामी काळात त्यात सुपला शॉटची भर पडली तर आश्चर्य वाटायला नको...
मुरुबाड शहापूर येथील टेनिस क्रिकेट स्पर्धेदरम्यानचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे आणि त्यात फलंदाजाने मारलेला सुपला शॉट सध्या चर्चेचा विषय बनला आहे.